आगीने नुकसान झालेल्या ब्राह्मणपाड्याच्या घटनास्थळाला प्रवीण दरेकरांची भेट

Pravin Darekar
  • व्यवसाय पुन्हा उभा करून देण्याचे दिले आश्वासन

मुंबई : कुटुंबातील चार व्यक्ती, घर आणि दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या कुटुंबातील  अनंता बाळू मौळे यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले तसेच मानवी दृष्टिकोनातून व्यवसाय पुन्हा उभा करून देण्यासाठी भाजपाकडून पाच  लाख रुपये मदत देऊ, असा विश्वास मौळे यांना  दिला, अशी माहिती भेटीनंतर विरोधी पक्षनेता  प्रवीण  दरेकर (Pravin Darekar) यांनी माध्यमांना दिली. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील ब्राह्मणपाडा स्टॉप येथील अनंता बाळू मौळे यांचे घर व होलसेल किराणा मालाचे दुकान होते, त्यात २८ मार्चला रात्री २.३० च्या दरम्यान अचानक शॉट सर्किटमुळे आग लागली, आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले. घरात अनंताची चार मुले, आई व पत्नी असे सात जणांचे कुटुंब राहात होते.  आगीत  वृद्ध आई गंगूबाई, पत्नी द्वारका, मुलगी पल्लवी (वय १५) तर मुलगा कृष्णा (वय १०) या चौघांचा झोपेतच होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. मुलगा भावेश (वय १२) व मुलगी अश्विनी (वय १७) हे दोघे भाजले असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले असून अनंता मौळे यांना डोक्याला दुखापत झाल्यामुळे त्यांना मोखाडा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

एकाच कुटुंबातील चार जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन  प्रवीण  दरेकर यांनी आज ब्राह्मणपाडा येथे जाऊन अनंता बाळू मौळे यांची सांत्वनपर भेट घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. या आगीत तीन  दुकाने पूर्णपणे जाळून खाक झाली असून त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आपद्ग्रस्त हे आदिवासी समाजाचे असून भेटीच्या वेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली की, नियमानुसार नुकसान भरपाईबाबत शासनाला प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे, या प्रस्तावाचीदेखील दरेकर यांनी माहिती घेतली. मौळे यांच्याशी बातचीत करताना त्यांनी दरेकर यांना अशी माहिती दिली की, घर व दुकान पूर्णपणे बेचिराख झाले असून घरावर १० लाख रुपयांचे कर्जदेखील आहे.

याच भेटीत दरेकर यांनी अधिकच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव पाठवावा व तातडीने मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. घातपाताची शंका आहे का, असा प्रश्न दरेकर यांनी मौळे यांना विचारला असता आग लागण्यापूर्वी मी बाथरूमला गेलो होतो, पण बाहेरून कुणी तरी कडी घातली होती, असा संशय मौळे यांनी व्यक्त केला. त्यावेळी तपास अधिकारी यांना याही अँगलने तपास करावा, अशा सूचना दरेकर यांनी दिल्याचे समजते. मौळे यांना  धीर देताना पुन्हा व्यवसाय उभा करून देण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे पाच  लाख रुपयांची मदत करू, सरकारकडून सानुग्रह अनुदान आणि नुकसान भरपाई  मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासनही दरेकर यांनी मौळे यांना  दिले. या भेटीच्या वेळी आमदार मनीषा चौधरी व भाजपाचे स्थानिक लोकप्रतिनिधीदेखील उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button