‘थोडं मुंबईच्या चकचकीत दुनियेतून बाहेर निघून महाराष्ट्रात फिरा’, भाजपचा मुख्यमंत्र्यांना टोला

Uddhav Thackeray-Praveen Darekar

मुंबई :- मागील काही दिवसांपासून एकीकडे कोरोनाचे संकट वाढत असताना दुसरीकडे मराठा आरक्षण आणि अन्य विषयांवरून राजकारण चांगलेच तापले आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा रद्द केल्यानंतर हा विषय पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजप ठाकरे सरकारवर टीका करताना दिसत आहे. थोडं मुंबईच्या चकचकीत दुनियेतून बाहेर निघून फिरा महाराष्ट्रात… कळेल, अशी टीका भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली गेली आहे.

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यासंदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेटीसाठी वेळ मागितली होती. मात्र, भेटीसाठी वेळ न दिल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपवर टीका केली होती. या टीकेला भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर देत काँग्रेसच प्रवक्ते सचिन सावंत आणि शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. एकामागून एक ट्विट करत प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी निशाणा साधला आहे.

ज्यांच्यासाठी बाजू मांडताय, त्यांची आता एव्हढी लाज निघालीय ना मराठा आरक्षणाबाबत सचिन सावंतजी, थोडं मुंबईच्या चकचकीत दुनियेतून बाहेर निघून फिरा महाराष्ट्रात… कळेल. ‘पोलखोल’ च्या नादात स्वपक्षाची आणि महाविकास आघाडीचीच लक्तरं तुम्ही वेशीवर टांगत आहात!, असे टीकास्त्र दरेकर यांनी सोडले.

युद्धाच्या ट्विटमध्ये दरेकर म्हणाले, बाकी विषय भरकटवण्यात तुम्ही, काँगेस आणि तुमचे सहकारी पक्ष यांचा हात कुणी धरू शकणार नाही. भाजपाची पोलखोल करण्यात वेळ घालवण्यापेक्षा मराठा आरक्षण कसं मिळेल याचा सल्ला सरकारला द्या. राहता राहिला प्रश्न ‘पोलखोलचा’ तर… महाविकास आघाडीचा मराठा आरक्षण न देण्याचा ‘नियोजनबद्ध दुर्लक्षपणाचा बुरखा’ आपल्या पोलखोलीनंतर मराठा बांधव आणि महाराष्ट्रासमोर आम्हीच टराटरा फाडू!, असा कडक इशारा दरेकर यांनी ट्विटच्या माध्यमातून दिला.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button