अजित पवारांचा स्नेह केवळ आणि केवळ सत्तेशी; प्रवीण दरेकरांची घणाघाती टीका

Pravin Darekar & Ajit Pawar

पंढरपूर : राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा स्नेह केवळ आणि केवळ सत्तेशी आहे, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली. दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही टीका केली. यावेळी त्यांनी राज्यातील विविध प्रश्नांवर भाष्य करत ठाकरे सरकारवर (Thackeray Government) टीकास्त्र सोडलं. यावेळी त्यांनी राज्यपालांच्या मुद्द्यावरूनही आघाडी सरकारवर टीका केली.

यावेळी ते म्हणाले की, राज्यपालांना विमानातून उतरवणे हा ठाकरे सरकारचा निव्वळ पोरखेळ आहे. राज्यपाल घटनात्मक पदावर आहेत त्यामुळे हा घटनात्मक पदाचा अवमान आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे मंजुरीसाठी फाईल गेली होती. पण त्यांनी बाजूला ठेवली. कायदा सर्वांना सारखा आहे, असं दरेकर म्हणाले.

कोणत्याही नेत्याविषयी चुकीची भाषा वापरणे योग्य नाही. आमच्या कार्यकर्त्यांचे वक्तव्य चुकीचे आहे. मात्र फडणवीस दाम्पत्यावर अश्लील भाषेत टीकाटिप्पणी केली जाते, त्याचे काय? असा सवाल करतानाच खालच्या स्तरावर टीका होऊनही आम्ही कुणाला मारहाण केली नाही. यापुढे अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.

दरेकर यांनी यावेळी गोपीचंद पडळकरांची (Gopichand Padalkar) पाठराखण केली. पडळकरांच्या भावना समजून घ्यायला हव्या. अहिल्याबाई होळकरांच्या स्मारकाचं उद्घाटन वर्षभरापासून रखडलं म्हणून त्यांनी उद्घाटन केलं. यापूर्वीही अनेक उद्घाटने झाली. पण गुन्हे दाखल झाले नाहीत, असं ते म्हणाले. तीन पक्षांची सत्ता आहे. या तिन्ही पक्षाची वेगवेगळी मते आहेत, असं सांगतानाच महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सत्ता किती दिवसाची? अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.

राज्यातील सरपंचच्या आरक्षणाची सोडत चुकीची पद्धत आहे. महाविकास आघाडीचे उमदेवार जास्तीत जास्त निवडून यावेत म्हणून निर्णय बदलण्यात आले आहेत. तसेच राज्यभर वीज खंडित करण्याच्या विरोधात रान पेटवणार असून सरकारला वठणीवर आणण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. तसेच पूजा चव्हाण प्रकरणाची सत्यता पुढे आली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER