तुम्ही निर्णय घ्या, आम्ही तुमच्या सोबत असू, प्रवीण दरेकरांचे मराठा तरुणांना आश्वासन

Praveen Darekar

मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून भाजपने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तात्काळ निकाली काढावा अन्यथा मराठा तरुणांबरोबर आम्हीही उपोषणाला बसणार, असा कडक इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी दिला. मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी मराठा तरुणांनी आंदोलन सुरू केलं आहे. या नांदोलनाला दरेकर यांनी भेट घेऊन आंदोलक तरुणांशी चर्चा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर यांनी आघाडी सरकारवर टीका केली.

यावेळी ते म्हणाले की, मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला जी मदत लागेल ती द्यायला आम्ही तयार आहोत. पण तोपर्यंत सरकारने एक अध्यादेश काढून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. मराठा तरुणांना दिलासा दिला पाहिजे. सरकार जर अध्यादेशाचा निर्णय घेणार नसेल तर आम्हालाही मराठा तरुणांसोबत उपोषणाला बसावं लागेल, असा इशारा दरेकर यांनी दिला.

मराठा समजाचा आक्रोश थांबला असेल त्यांची ताकद संपली असेल याचा सरकारला भ्रम असेल. त्यामुळेच आंदोलनाचा आवाज या सरकारच्या कानापर्यंत जात नाही. या आंदोलनाची दखल घेण्यासाठी सरकारच्याएकाही प्रतिनिधीने भेट दिली नाही. हे गेंड्याच्या कातडीचं सरकार असून केवळ मराठा समजाला खेळवा-खेळवीचं राजकारण हे सरकार करत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला. ठाकरे सरकारच्या मनात पाप आहे. सर्व भरत्या सुरू केल्या आहेत. सोंग आणि ढोंग करण्याचं काम या सरकारने सुरू केलं आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

भाजप नेते पंकजा मुंडे यांनी ओबीसींची जनगणना करण्याची मागणी केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देण्यास दरेकर यांनी टाळाटाळ केली. पंकजा मुंडे या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्यांच्या वक्तव्यावर पक्षच आपली भूमिका स्पष्ट करेल, असं सांगत दरेकर यांनी या मुद्द्यावर अधिक भाष्य करणं टाळलं.

मुख्यमंत्र्यांचे फायलीवरील शेरे बदलले जात असल्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांचे फायलीवरील शेरे बदलणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. हे शेरे बदणारे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत? असा सवाल करतानाच सरकारचा प्रशासनावर अंकूशच राहिलेला नाही हे या निमित्ताने दिसून येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

वेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी केलेल्या गौप्यस्फोटावरही टीका केली. शशिकांत शिंदे यांना 100 कोटींचीही किंमत नाही. आमच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला. त्यामुळे त्यांना तिथे किंमत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER