पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा आईने हंबरडा फोडताच दरेकरही अक्षरशः रडले

पुरात वाहून गेलेल्या आईने हंबरडा फोडताच दरेकरही अक्षरशः रडले

सांगली :- महाराष्ट्रात झालेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rains) राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सांगलीत (Sangli) पोहचलेले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना एका आईचा हंबरडा ऐकून अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. पुरात वाहून गेलेल्या मुलाच्या आईने हंबरडा फोडताच दरेकरही अक्षरशः रडले.

आजच्या सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी दरेकर यांनी तडवळे गावाला भेट दिली. या गावातील शुभम जाधव हा २२ वर्षाचा तरुण अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्यामुळे जाधव यांच्या कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळेच शुभमच्या आईला दुःख अनावर झालं. प्रवीण दरेकर यांनी आज शुभमच्या कुटूंबियांचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी भेट दिली. आपलं दु:ख दरेकर यांच्याकडे मांडताना शुभमच्या आईने हंबरडा फोडला. माझे लेकरु पाण्यात वाहून गेले. मला माझे पिल्लू परत द्या. माझे लेकरु मला पुन्हा हवे आहे. माझा संसार उध्वस्त झालाय. संसार फाटला, आम्हाला आधार देणारा निघून गेला. पावसाने आमचा घात केला. आमचे भविष्य बरबाद झाले. आता आम्हाला न्याय कोण देणार? या शब्दात त्या आईने आपली व्यथा दरेकर यांच्याकडे मांडली.

यावेळी आईच्या या व्यथा ऐकून दरेकर यांनाही अश्रू अनावर झाले आणि अक्षरशः रडायला लागले. मात्र स्वतःला सावरत दरेकर यांनी संवेदनशीलपणे जाधव कुटुंबियांना धीर दिला. त्यांचा प्रश्न सरकार दरबारी मांडण्याचं आश्वासन दिलं. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जाधव कुटुंबाला न्याय मिळवून देऊ असं वचन दरेकर यांनी यावेळी दिलं. दरेकरांनी यासंदर्भात तेथे उपस्थित असलेल्या तहसिलदारांशी चर्चा केली. हा विषय अतिशय संवेदनशील असून याप्रकरणी आपण जिल्हाधिकाऱ्यांशी बोलू व त्यांना लवकर मदत मिळवून देऊ. ताई आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही काळजी करु नका, या शब्दात दरेकर यांनी त्यांना धीर दिला. अतिवृष्टीमुळे त्यांचं कुटुंब उध्वस्त झालंय, पण अद्यापही कुठलीही शासकीय मदत त्यांना मिळालेली नसल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER