पॅकेजची घोषणा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार – प्रवीण दरेकर

CM Uddhav Thackeray - Pravin Darekar

रत्नागिरी :- शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने दिलेलं पॅकेज अत्यंत कमी आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली आहे. सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचा भंग केला. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला नाही, असंही ते म्हणाले.

राज्यातील महाआघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) जाहीर केलेली १० हजार कोटीच्या पॅकेजची घोषणा अत्यल्प असून शेतकऱ्याच्या दाढेलाही पुरणार नाही. कोकणात आणि उर्वरित महाराष्ट्रात शेतकऱ्यांकडे असलेली जमीन धारणा अल्यत्प आहे. परिणामी, शेतकऱ्यापर्यंत गुंठ्याला शंभर रुपये मदत जरी पोहोचली, तरी शेतातील पिकाची नासाडी साफ करण्यासाठीच त्यापैकी पन्नास रूपये जातील.

लॉकडाऊनच्या काळात गावाकडे रोजगाराविना आलेला शेतकरी महाआघाडी सरकारकडे मोठ्या अपेक्षेने भरीव नुकसानभरपाईची अपेक्षा धरुन बसला असताना राज्यातील शेतकऱ्यांना बांधावर जाऊन निवडणुकीआधी दिलेल्या आश्वासनांच्या तुलनेत भ्रमनिरास करणारी घोषणा आहे, अशी जळजळीत टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक भवानवाडीतील अंकूश सपकाळ यांच्या शेतावर जाऊन दरेकर यांनी भातशेतीच्या नुकसानीची पाहणी केली. राज्यात काळजीवाहू मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी १० हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले होते. या महाआघाडी सरकारने घोषणा करायची म्हणून घोषणा केली आहे. या घोषणेने शेतकरी आपल्या दुखातून बाहेर पडणार नाही. लाखो एकर जमीनी बाधित झाल्या आहेत. हे लक्षात घेऊन जे पॅकेज निवडणुकीपूर्वी कोरडवाहूला २५ हजार, बागायतीला ५० हजार आणि फळपीकला १ लाख रुपये जाहीर केले होते. त्याची वचनपूर्ती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी जाहीर केलेल्या पॅकेजने होणार नाही. १० हजार कोटींच्या पॅकेजमधील रस्ते पूल आणि अन्य पायाभूत सुविधांसाठी जो निधी जाईल तो पाहता शेती आणि फळपीकासाठी केवळ पाच-साडेपाच हजारांची मदत होऊ शकेल, त्यामुळे ही पॅकेजची घोषणा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे, असे यावेळी प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेले पॅकेज फसवे – फडणवीस यांची टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER