सत्तेत आल्यापासून शिवसेनेच्या संवेदना गोठल्या; कोकण मदतीवरून दरेकरांचा टोला

मुंबई :- निसर्ग चक्रीवादळानंतर कोकणाचा अधिकाधिक भाग उद्ध्वस्त झाला आहे. कोकणाला सरकारच्या भरीव मदतीची गरज आहे. मात्र, सरकारच्या करणी आणि कथनीमध्ये फरक आहे. सत्तेत आल्यापासून शिवसेनेच्या संवेदना गोठल्या आहेत. ज्या कोकणाने शिवसेनेला भरभरून प्रेम दिलं त्या कोकणाला मदत देताना उद्धव ठाकरे हात आखडता घेत आहेत, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

प्रवीण  दरेकर आज अलिबाग येथे होते. निसर्ग चक्रीवादळानंतर राज्य सरकारने दिलेल्या मदत वाटपाच्या कामाचा आढावा त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. यानंतर जिल्ह्यातील मदत वाटप कामाबाबत त्यांनी समाधानदेखील व्यक्त केले. मात्र त्याच वेळी मदत वाटपात राजकीय हस्तक्षेपाबाबत नाराजीसुद्धा त्यांनी व्यक्त केली.

ते अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयात मदत वाटप आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. निसर्ग चक्रीवादळात बाधित झालेल्या बागायतदारांना झाडांच्या संख्येनुसार मदत मिळायलाच हवी, अशी मागणी त्यांनी केली.

शासनाने दिलेली बागायतदारांना हेक्टरी ५० हजार मदत अपुरी असल्याचेही दरेकर म्हणाले.

यावेळी पत्रकारांनी केंद्राकडून मिळणा-या मदतीबाबत विचारले असता ते म्हणाले, उशीर झाला असला तरी केंद्राकडून मदत नक्की मिळेल. सध्या एनडीआरएफच्या माध्यमातून जो निधी वितरित होत आहे. तो केंद्राचाच असल्याचा दावा दरेकर यांनी केला. पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये आलेल्या वादळामुळे झालेले नुकसान जास्त होते. त्यामुळे केंद्राची  तिथे तातडीने मदत दिली गेली होती. त्या तुलनेत कोकणात झालेले नुकसान कमी आहे. त्यामुळे केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर केंद्राकडून मदत दिली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER