
पुणे : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पण लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करु नका. कुठलीतरी जुलमी राजवटासारखी कृती करु नका. खरं तर राज्यातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार कमी पडलं, असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी राज्य सरकारवर केला. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत चालले आहेत. आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा संवाद संध्याकाळी सात वाजता होणार आहे. भावनिक आवहानापेक्षा, संवादापेक्षा क्षमतेने आणि गतीने कृती करण्याची आवश्यकता आहे. कारण इतर राज्यांमध्ये कोरोना संपुष्टात आला. त्या राज्यांनी व्यवस्था ही क्षमतेने आणि ताकदीने केली. कदाचित आपण कमी पडलो. आपला रिकव्हरी रेट अत्यंत कमी आहे. कोरोनाने आर्थिक कंबरडं मोडलं तेव्हा इतर राज्यांनी आर्थिक पॅकेज जाहीर केले. पण या सरकारने तसे काही आर्थिक पॅकेज जाहीर केलं नाही, असं प्रवीण दरेकर म्हणाले.
मंत्र्यांनी कंटेन्मेंट झोन घोषित करु, मार्शल नेमू, अधिकचा दंड वसूल करु, अशाप्रकारचे वक्तव्य करुन दहशत निर्माण करण्यापेक्षा लोकांना आधार देऊन मार्ग काढावा, ही सरकारला विनंती आहे. लोका सांगे ब्रह्म ज्ञान, आपण पिवळे पाषाण, अशी स्थिती आहे. कोरोना परिस्थितीत महाविकास आघाडीचे नेते ज्या लग्नाला जात आहेत तिथली गर्दी बघा. हजारोचां जनसमुदाय होता. कालच सरोज अहिरे यांचं लग्न झालं. तिथे सर्व महत्त्वाचे नेते होते, असं दरेकर यांनी सांगितलं.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दोन-चार दिवसांपूर्वी एक मोठं धमकी वजा धाडसी विधान केलं. अभिनेता अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे चित्रपट होऊ देणार नाही. धमकी आणि कृतीत फरक असतो. नंतर त्यांनी भूमिका मागे घेतली. आम्ही झेंडे दाखवू, असे ते म्हणाले. आता तेही दाखवतील की नाही ती शंका आहे. खरंतर ही भूमिका महाविकास आघाडी आणि सरकारची आहे का ते मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी जाहीर करावी. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर क्रेनने फुलांचा वर्षाव केला. तेव्हाही हजारोंचा जनसमुदाय होता. धनंजय मुंडे यांना निर्दोषत्व बहाल झाल्यासारखं ते जेव्हा बाहेर निघाले त्याही वेळेला क्रेनने फुलांचा वर्षाव झाला. सरकारच्या नेत्यांनीही नियम पाळावे, असं आवाहन त्यांनी केलं.
एका बाजूला अमिताभ बच्चन यांचं सामाजिक योगदान, मिलेट्रीसाठी त्यांनी दिलेलं योगदान, शहीद मिलेट्रीमॅनच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी काम केलंय. अक्षय कुमारचंदेखील त्याचप्रकारे काम आहे.”सरकारमध्ये असून सरकारी पक्षातील एक प्रदेशाध्यक्ष अशाप्रकारचं वक्तव्य करतं. त्याबद्दल नेमकी भूमिका काय? हेही स्पष्ट होण्याची अत्यंत आवश्यकता आहे, असं दरेकर म्हणाले.
पूजा चव्हाण प्रकरणावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि मी वारंवार भूमिका जाहीर केली आहे. तरुणीच्या आत्महत्येला आता 15 दिवस उलटले आहे. अजूनही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. अजूनही नेमकं काय झालं हे सांगायला सरकार म्हणून कुणीही समोर येत नाही. समाजाचे मोर्चे प्लॅन करुन काढले जात आहेत. सरकार पाठीशी घालत आहे. सरकार हे प्रकरण दडपण्याचं प्रयत्न करत आहे की काय अशा प्रकारचा संशय सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होतोय, असे मत दरेकर यांनी व्यक्त केले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला