मदत सोडून फडणवीसांवर कुत्सित टिप्पणी करणारे मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे अश्रू काय पुसणार – दरेकर

Praveen Darekar on cm uddhav thackeray .jpg

पंढरपूर : पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करायला आलेले मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray) नुकसानीच्या मदतीबाबत बोलणे सोडून फडणवीसांवर कुत्सित टिप्पणी करतात व असे करून आपले अपयश झाकण्यासाठी विषय दुसरीकडे नेत आहेत. या सरकारची ही स्ट्रॅटेजीच बनली असून चक्रीवादळ असो, कोरोना असो, अतिवृष्टी गारपीट असो किंवा महापूर अशा सर्वच काळात कधी केंद्र सरकार , कधी बिहार पोलीस व मुंबई पोलीस तर कधी राज्यपाल व मुख्यमंत्री असे विविध वाद निर्माण करून जनतेचे लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा हल्लाबोल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी केला.

पंढरपूर तालुक्यातील महापुरामुळे झालेल्या नुकसान पाहणीसाठी सोमवारी गावागावात दरेकर यांनी बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव टाकरेंवर टीकास्त्र सोडले.

दरेकर म्हणाले, निवडणुकीपूर्वी जी गारपीट झाली होती तेव्हा बांधावर जाऊन हेक्टरी २५ व ५० हजार रुपयाच्या मदतीची मागणी ठाकरे करीत होते. आता तर त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली असताना वचन पाळणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी वाचन पाळावे व तात्काळ पंचनामे न करता मदत द्यावी असा टोला लगावला. तुमची जबाबदारी आधी पूर्ण करा आणि मग केंद्राकडे बोट दाखवा असे सांगताना, ज्यांच्याकडे मदत मागायची त्यांच्यावर टीका ही दुटप्पी भूमिका जनतेला कळते. हे रडणारे सरकार आहे, ते काय अश्रू पुसणार? केंद्र सरकार त्याची जबाबदारी पूर्ण करणारच आहे पण तुम्ही त्यांच्याकडे बोट दाखवून जबाबदारीतून पळू नका, असेही दरेकर यांनी राज्य सरकारला सुनावले.

दरम्यान, येत्या आठ दिवसांत राज्य सरकारने मदत केली नाही तर भाजप शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष उभारेल, असा इशाराही प्रवीण दरेकर यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER