केंद्राने केलेल्या मदतीची श्वेतपत्रिका काढा, प्रवीण दरेकर यांची ‘ठाकरे’ सरकारकडे मागणी

CM-Uddhav-Thackeray-Pravin-Darekar

मुंबई : राज्यात कोरोना लसींचा (Corona vaccines) मुबलक साठा उपलब्ध आहे. मात्र, केंद्राने मदत केली नसल्याचा कांगावा सध्या सुरू आहे. केंद्र सरकारविरोधात नागरिकांमध्ये संताप उत्पन्न करण्यासाठी ठाकरे सरकार (Thackeray govt) जाणुनबुजून सामान्य नागरिकांना लस उपलब्ध करुन देत नसल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Praveen Darekar) यांनी केला.

लसीकरणाच्या मुद्द्यावरुन राजकारण होता कामा नये. मात्र, ठाकरे सरकार केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक कट आखून काम करत आहे. आतापर्यंत केंद्राकडून आलेल्या मदतीची श्वेतपत्रिका काढा, दूध का दूध, पाणी का पाणी होईल, अशी मागणी दरेकर यांनी केली.

ते सोमवारी मुंबईत पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला लसींचा अपेक्षित पुरवठा होत नसल्याचे सर्व आरोप फेटाळून लावले. एकीकडे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राने सर्वाधिक लसीकरण केल्याचा दावा राज्य सरकार करत आहे. ३० लाख नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळाल्याचे सांगत आहे. मग या लसी केंद्र सरकारने दिल्याशिवाय मिळाल्या का, असा प्रश्न प्रविण दरेकर यांनी विचारला. तसेच ‘दूध का दूध, पानी का पानी’ करण्यासाठी राज्य सरकारने आजपर्यंत केंद्राकडून आलेली मदत आणि त्यांनी नागरिकांना उपलब्ध करुन दिलेल्या सुविधा या दोन गोष्टींची श्वेतपत्रिका काढावी, असे आव्हान प्रविण दरेकर यांनी दिले.

या पत्रकारपरिषदेत प्रविण दरेकर यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही धारेवर धरले. सुरुवातीला महापालिका आयुक्त आम्हाला भेटण्यास तयार नव्हते. मात्र, आम्ही आंदोलनाचा इशारा दिल्यावर दुपारी साडेतीन वाजता ते आम्हाला भेटायला तयार झाले. केंद्र सरकारने देशव्यापी लॉकडाऊनचा निर्णय घेतला तर तो पाळणे सर्व राज्यांना क्रमप्राप्त आहे. आयुक्त हे केंद्र सरकारच्या वरती नाहीत. त्यामुळे त्यांनी मर्यादेत राहून बोलावे, असे प्रविण दरेकर यांनी म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी परदेशातून आलेली मदत कुठे गेली, असा सवाल केंद्र सरकारला केला होता. मात्र, त्यांनी हा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना विचारावा. कतारमधून वैद्यकीय सामुग्री घेऊन एक जहाज मुंबईत दाखल झाले होते. या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी मंत्री आदित्य ठाकरे त्याठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे परदेशातून आलेल्या मदतीपैकी महाराष्ट्राला काय मिळालं, हा सवाल जयंत पाटील यांनी आदित्य ठाकरेंना विचारावा, असे प्रविण दरेकर यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button