शिवसेना शरद पवारांच्या चरणी लीन झाली; प्रवीण दरेकरांची टीका

Uddhav Thackeray & Sharad Pawar & Pravin Darekar

मुंबई : शिवसेना (Shivsena) ही राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या चरणी लीन झाली आहे, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी शिवसेनेला लगावला आहे . हिंदुत्वाचा विचार सोडून शिवसेना महाविकास आघाडीमध्ये गेली तेव्हाच त्यांचे आचार आणि विचार कळाले, अशा शब्दांत  दरेकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला .

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेला कृषी कायदा हा शेतकऱ्यांचा आत्मा आहे. आजच्या भारत बंदमध्ये सहभागी झालेल्या राजकीय पक्षांना शेतकऱ्यांचा पुळका नाही. फक्त स्वार्थासाठी हे सर्व सुरू असल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे. असाच कायदा करावा म्हणून याच पक्षांनी पत्रकं   काढली होती, कायद्याला समर्थन दिलं होतं आणि आज विरोध करत असल्याची टीका दरेकर यांनी केली आहे. या नेत्यांच्या कथनी आणि करणीतील फरक शेतकऱ्यांना निश्चित कळतो, असंही दरेकर म्हणाले. शरद पवार यांच्या भूमिका या काळानुरूप बदलत चालल्या आहेत.

पवारसाहेबांचे बदललेले स्वरूप देशासमोर आले आहे. स्वत: केंद्रीय कृषिमंत्री असताना त्यांनी सर्व राज्यांतील  मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून हा कायदा किती महत्त्वाचा  आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. आता मात्र पंतप्रधान मोदींनी कायदा केला तर त्याला विरोध का? असा सवालही दरेकर यांनी विचारला आहे. शिवसेना इतिहास विसरत चालली आहे. बाळासाहेबांनी काय केलं हेदेखील ते विसरले आहेत. देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत, हे कुणालाही दाखवण्याची गरज नाही. विरोधकांचा आजचा बंद हा शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER