राज्यपाल नियुक्त आमदारकी म्हणजे नेत्यांची सोय लावण्याचे ठिकाण नाही : प्रवीण दरेकर

Pravin_Darekar

उस्मानाबाद : विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांचा तिढा अद्यापही कायम आहे. त्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi) टोला लगावला आहे. ‘विधान परिषदेतील जागा या राजकीय जागा नाहीत. तर त्या साहित्यिक, पत्रकार यांच्याकरिता आहेत. राज्यपालांनी कुणाला नियुक्त करावं याचे काही संकेत, परंपरा आणि निकष आहे. संविधान आणि राज्यघटनेनं राज्यपालांना जे अधिकारी दिले आहेत. त्या चौकटीत राहून राज्यपाल योग्य तो निर्णय घेतील. राजकीय नेत्यांची सोय लावण्याची ही जागा नाही’, अशा शब्दात प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी त्यांनी वीजबिलाच्या मुद्द्यावरून ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांच्यावरही टीका केली. ग्राहकांचे वीजबिल माफ करण्याचा शब्द सुरूवातीला ऊर्जामंत्र्यांनीच दिलेला होता. आता मात्र सक्तीने वीजबिल वसूल करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. हा प्रकार सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर मिठ चोळण्यासारखा आहे. त्यामुळे खात्याचा कारभार हाकता येत नसेल तर राजीनामा देऊन ऊर्जामंत्र्यांनी महावितरणमध्ये (MSEDCL) कारकुनाची नोकरी करावी, असा टोला त्यांनी लगावला.

याप्रसंगी मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) बोलताना दरेकर म्हणाले की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊ केले होते. ते आरक्षण टिकिवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार गंभीर दिसत नाही. आरक्षणाचा प्रश्न सरकार भिजत ठेवत आहे. परिक्षा घेतल्या नाहीत. या माध्यमातून तर समाजालाही झुलवत ठेवण्याचे काम हे सरकार करीत आहे.

दरम्यान, राज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या निवडीसाठी पाठवलेली यादी २१ नोव्हेंबरपर्यंत मंजूर करण्यात यावी, अशी विनंती राज्य सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केली होती. त्याची मुदत आज संपत असल्याने राज्यपालनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) योग्य निर्णय घेतील. ते समजूतदार आहेत, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केले.

राज्य सरकारने राज्यपालांकडे आमदारकीसाठी पाठवलेली सर्व नावे योग्य आहेत. सर्व निकषांचे पालन करूनच ही नावे निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे आता राज्यपाल यावर निर्णय घेतील, अशी आशा छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. ते शनिवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER