कमिशनमुळे ‘ठाकरे सरकार’ची रेमडेसिवीर खरेदी रखडली, प्रवीण दरेकरांचा आरोप

Pravin Darekar - CM Uddhav Thackeray

मुंबई : संकटाच्या काळात कोरोना रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी भाजपने ५० हजार रेमडेसिवीर कुप्या राज्यातील जनतेला देण्याचे वचन दिले होते. त्यावर भाजप ठाम असून रेमडेसिवीरच्या कुप्या आम्ही जनतेला थेट न वाटता ते राज्य सरकारला सुपूर्द करणार आहोत, अशी ग्वाही विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते व भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी बुधवारी ‘दिव्य मराठी’ला दिली. तसेच कमिशन मिळत नसल्याने महाविकास आघाडी सरकारची रेमडेसिवीरची खरेदी रखडली, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

दरेकर म्हणाले की, मी व भाजप आमदार प्रसाद लाड आम्ही दोघांनी दमण येथील ब्रुक फार्मा कंपनीला १२ एप्रिल रोजी भेट दिली होती. कंपनीकडे रेमडेसिवीरचा साठा असल्याची माहिती कंपनीने आम्हाला दिली. मात्र महाराष्ट्राला हा साठा देण्यासाठी राज्याच्या एफडीएची परवानगी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापकासह अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांची १५ एप्रिल रोजी भेट घेतली. १६ एप्रिल रोजी एफडीए आयुक्तांनी ब्रुक फार्मा कंपनीला महाराष्ट्रात विक्री करण्याची परवानगी दिली. भाजप कंपनीच्या संपर्कात आहे. कंपनीला आणखी काही परवानग्या आवश्यक आहेत. त्या मिळाल्या की ५० हजार रेमडेसिवीर आम्ही आणू, असे दरेकर यांनी सांगितले. कमिशनमुळे राज्य सरकारची रेमडेसिविर खरेदी रखडली आहे, असा आरोप दरेकर यांनी केला. भाजप देणार असलेल्या ५० हजार रेमडेसिविर कुप्यांची किंमत सुमारे ४ कोटी ७५ लाख इतकी होईल, असेही दरेकरांनी स्पष्ट केले.

आम्ही रेमडेसिवीर नागरिकांना वाटणार नाही. ते राज्य सरकारला देणार आहोत. ‘प्रयत्न केल्यास रेमडेसिवीर उपलब्ध होते, हे आम्हाला उद्धव सरकारला दाखवून द्यायचे आहे. त्याचप्रमाणे राज्यातील जनतेला मदत म्हणून भाजप ५० हजार कुप्या पुरवणार आहे, असे दरेकर यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button