मधुर भांडारकरच्या नव्या सिनेमात दिसणार प्रतीक बब्बर आणि सई ताम्हणकर

India Lockdown - Madhur Bhandarkar - Sai Tamhankar - Prateik Babbar

मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar) नेहमी वेगळ्या विषयांवर अत्यंत उत्कृष्ट असे सिनेमे बनवतो. त्याचे विषय वेगळे असतात आणि त्याची ट्रीटमेंटही वेगळी असल्याने प्रेक्षकांना त्याचे सिनेमे प्रचंड आवडतात. त्याचे सिनेमे चांगले असल्याने त्यांना राष्ट्रीय पुरस्कारासह विविध पुरस्कारांनीही गौरवण्यात आले आहे. ‘चांदनी बार’, ‘पेज 3’, ‘सत्ता’, ‘फॅशन’, ‘कॉर्पोरेट’, ‘हीरोइन’ असे विविध सिनेमे तयार केले आहेत. २०१६ मध्ये मधुर भांडारकरने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर ‘इंदू सरकार’ सिनेमा तयार केला होता. या सिनेमावरून खूप गदारोळ झाला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष चालला नव्हता. त्यानंतर आता पाच वर्षांनी मधुरने पुन्हा एकदा लाइट्स-कॅमेरा-अॅक्शन म्हणण्यास सुरुवात केली आहे. दोन-तीन दिवसांपूर्वीच मधुरने एका नव्या सिनेमाची ‘इंडिया लॉकडाऊन’ची घोषणा केली होती आणि लवकरच त्याचे शूटिंग सुरू करू असे म्हटले होते. मात्र त्याने लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारीच सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. मधुरच्या या सिनेमात प्रतीक बब्बर (Prateik Babbar), सई ताम्हणकर (Sai Tamhankar), आहना कुमरा, श्वेता बसु प्रसाद मुख्य भूमिका साकारणार आहेत.

या नव्या सिनेमाबाबत बोलताना मधुरने सांगितले, ‘माझा हा सिनेमा सत्य घटनांवर आधारित आहे. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन लागू झाला आणि सर्व व्यवहार जेथल्या तेथे थांबले. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांची म्हणजे मार्च-एप्रिलमधील देशातील कोरोना काळातील स्थिती या सिनेमात दाखवली जाणार आहे. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात श्रमिक, सेक्स वर्कर, व्यापारी आणि घरी एकटे असलेल्यांना खूप मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते. सुरुवातीला सगळे घरी होते. अशा स्थितीत काय करावे हेच कोणाला सुचत नव्हते. कारण आपल्याला अशा पद्धतीने घरी बसण्याची सवय नसते. कोरोना काळातील हीच स्थिती काही उदाहरणांसह मी सिनेमात दाखवणार आहे.’

आहना कुमरा ही या सिनेमात पायलटची भूमिका साकारीत आहे. भूमिकेबाबत बोलताना आहनाने सांगितले, मी या सिनेमात एका पायलटची भूमिका साकारीत आहे. लॉकडाऊनमुळे मला मुंबईतील माझ्या घरात राहावे लागते. मी सतत फिरणारी असताना जेव्हा घरात राहावे लागते तेव्हा घरातील नातेसंबंधांबाबतचे महत्त्व मला कळते. घरात एकटी असल्याने मला ते प्रकर्षाने जाणवते. माझी भूमिका खूपच चांगली आहे. मला ‘इंडिया लॉकडाऊन’मध्ये अशी ही भूमिका साकारण्याची संधी दिल्याबद्दल दिग्दर्शक मधुर भांडारकर यांची मी खूप खूप आभारी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER