
मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक(Pratap Sarnaik) सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात दाखल झाले आहेत. सरनाईक यांना ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आला होता. त्यानुसार ते ईडी कार्यालयात हजर झाले असून चौकशीला सुरुवात झाली आहे. दिल्लीमधून आलेल्या ईडीच्या टीमने प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयांवर छापे टाकल्याने प्रकरण चांगलंच तापलं होतं. सर्वोच्च न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण मिळाल्यानंतर सरनाईक पिता-पुत्र ईडी कार्यालयात हजर झाले आहेत.
प्रताप सरनाईक यांच्यासह मुलगा विहंग सरनाईक यांची चौकशी होणार आहे. टॉप्स सिक्युरिटी घोटाळ्याबाबत २४ नोव्हेंबर रोजी ईडीने प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या. ईडीने २४ नोव्हेंबर रोजी प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती.
ईडीने सरनाईक यांच्या घर, कार्यालय आणि हॉटेलसह १० ठिकाणांवर छापे मारले होते. त्यावेळी सरनाईक भारताबाहेर होते. ईडीचे छापे पडल्याचं कळताच ते भारतात आले आणि त्यांनी तडक प्रभादेवीतील ‘सामना’ कार्यालयात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली. तब्बल दीड तास या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर बोलताना ईडीने कारवाई का केली? कशासाठी केली? याची काहीच कल्पना नसल्याचं सरनाईक यांनी सांगितलं होतं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला