प्रताप सरनाईक यांचा निकटवर्ती चांदोलेला ९ डिसेंबरपर्यंत ईडीची कोठडी

Pratap Sar Naik & ED

मुंबई : रक्षक पुरवणाऱ्या एका कंपनीत झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आलेला अमित चांदोलेंची (Amit Chandole) रवानगी पुन्हा एकदा ईडीच्या कोठडीत करण्यात आली आहे. ईडीने यासंदर्भात दाखल केलेली याचिका स्वीकारत मुंबई उच्च न्यायालयाचा २९ नोव्हेंबर रोजी चांदोलेला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा आदेश रद्द केला. मुंबई सत्र न्यायालयाला यावर तातडीने सुनावणी घेत नव्याने आदेश देण्याचे निर्देश जारी केले. दुपारी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात पार पडलेल्या सुनावणीत अमित चांदोलेला ९ डिसेंबरपर्यंत पुन्हा ईडीच्या ताब्यात देण्याचे निर्देश जारी केले.

ईडीने ताब्यात घेतलेल्या अमित चांदोलेची केवळ तीन दिवसांची कस्टडी मिळाल्याने याप्रकरणी चौकशी पूर्ण होऊ शकली नाही. चौकशी पूर्ण होईपर्यँत याप्रकरणातील पुढील धागेदोरे सापडणार नाहीत. असा दावा करत ईडीने सत्र न्यायालयाने रिमांड नाकारल्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्यापुढे सुनावणी झाली. शुक्रवारी यावरील आपला निकाल राखून ठेवलेला निकाल हायकोर्टाने सोमवारी सकाळी जाहीर केला.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा निकटवर्तीय चांदोले याला ईडीने २५ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले होते. पहिल्या रिमांडमध्ये त्याला २९ नोव्हेंबरपर्यंत ईडी कस्टडी देण्यात आली. मात्र दुसऱ्याच सुनावणीत त्याचा पोलीस रिमांड वाढविण्यास न्यायालयाने नकार दिला देत चांदोलेला १४ दिवसांच्या न्यायलयीन कोठडीत पाठवले. या प्रकरणात कागदपत्रे आणि व्यवहार तपासाचे आहेत. हवालाबाबत चौकशी करायची आहे, त्यासाठी आरोपीचा आणखी रिमांड हवा आहे, असा युक्तिवाद ईडिकडून अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी केला. चांदोलेच्यावतीने या आरोपांचे खंडन करण्यात आले होते. विशेष न्यायालयात योग्य कागदपत्रे दाखल न केल्यामुळे ईडीची मागणी कोर्टाने फेटाळली आहे. आता पुन्हा रिमांड केवळ शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना अडकविण्यासाठी मागितला जातो आहे, असा दावा चांदोलेचे वकील रिझवान मर्चंट यांनी हायकोर्टात केला. सरनाईक यांचे आर्थिक व्यवहार चांदोलेला असे माहीत असतील? तो सरनाईकांचा सीए नाही. असा दावा चांदोलेच्यावतीने करण्यात आला होता.

एमएमआरडीएच्या सुरक्षा रक्षक कंत्राटात २०१४ मध्ये गैरप्रकार झाला. त्याचा आर्थिक फायदा प्रताप सरनाईक आणि अमित चांदोले यांनी घेतला, अशी तक्रार कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याने केली आहे. याप्रकरणात सरनाईक कुटुंबियांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER