प्रताप सरनाईकांच्या मित्राने एमएमआरडीएकडून लाटले कोट्यवधी रुपये

- इडीने चौकशीसाठी घेतले ताब्यात

Pratap Sarnaik

ठाणे :- शिवसेना (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक (Shiv Sena Leader Pratap Sarnike) यांचे निकटवर्तीय आणि सरनाईक परिवाराच्या कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदावर असलेले अमित चंडोळे (Amit Chandole) यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ताब्यात घेतले.

अमित चंडोळे यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून  (MMRDA)  कोट्यवधी रुपये लाटले, असा आरोप आहे.

अमित चंडोळे यांच्यावर कोणाचा वरदहस्त आहे? ‘टॉप्स सिक्युरीटी’चे सर्वेसर्वा राहुल नंदा यांच्यासाठी अमित चंडोळे हेच MMRDA मध्ये एजंट म्हणून काम पाहात होते. राहुल नंदा आणि अमित चंडोळेची भेट कोणी करून दिली? राहुल नंदांसोबत लंडनमध्ये कोणी पैसे गुंतवले होते? याचा शोध घेणे सुरू आहे.

टॉप सिक्युरिटीचे व्हाईस चेअरमन रमेश अय्यर यांनी टॉप्स सिक्युरिटीमध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी मुंबईतील यलोगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. त्यानुसार राहुल नंदा यांच्याकरिता MMRDA तील व्यवहार मध्यस्थी म्हणजेच एजंट म्हणून २०१४ पासून अमित चंडोळे आणि संकेत मोरे नावाची व्यक्ती करत होती. MMRDA करिता सुमारे ३०० ते ५०० सिक्युरिटी गार्ड्सची गरज होती. हे  गार्ड्स अमित चंडोळे आणि संकेत मोरे यांनी टॉप्स सिक्युरिटीतून MMRDA ला पुरवले होते. मात्र, प्रत्यक्षात ७० टक्के  गार्ड्स पुरवून बनावट कागदपत्रांच्या आधारे MMRDA तून १०० टक्के  गार्ड्सचे  बिल काढले जात होते.

ही बातमी पण वाचा : सरनाईक यांच्या अडचणीत वाढ, व्यावसायिक भागीदार अमित चांदोळे यांना ईडीकडून अटक

या बदल्यात संकेत मोरे आणि अमित चंडोळे यांना राहुल नंदा यांच्याकडून दरमहिन्याला ५० हजार रुपये, प्रत्येक गार्डमागे ५०० रुपये आणि ३० टक्के  गार्ड्सची   बनावट कागदपत्रे सादर करून MMRDA कडून घेतलेल्या पैशांतून ५० टक्के रक्कम म्हणजे दरमहिना संकेत मोरे आणि अमित चंडोळे या दोघांना चार  ते पाच लाख रुपये राहुल नंदा द्यायचे. राहुल नंदा हे पैसे थेट देत नव्हते. MMRDA चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज बिजलानी बॉम्बे कॅफे, मॅसेज बंदर, मुंबई-०९ या कॅफेमध्ये देत असत.

२०१७ ते २०२० या काळात नीरज बिजलानी यांनी २ कोटी ३६ लाख रुपये कमिशनपैकी ९० लाख रुपये रोख अमित चंडोळे यांना बॉम्बे कॅफे येथे दिले होते. उरलेले १ कोटी ४६ लाख रुपये राहुल नंदा यांनी टॉप्स सिक्युरिटीच्या खात्यातून अमित चंडोळे यांच्या खात्यात वळते केले होते. अशा प्रकारे वेगवेगळ्या कामांचे कोट्यवधी रुपये अमित चंडोळेला राहुल नंदा यांनी दिले होते.

रमेश अय्यर यांच्या तक्रारीवरून अनेक प्रश्न उपस्थित…

  • अमित चंडोळेसारखा माणूस उद्योगपती राहुल नंदा यांच्या थेट संपर्कात कोणामुळे आला?
  • MMRDA मध्ये अमित चंडोळे कोणत्या राजकीय नेत्याचे नाव वापरायचा?
  • MMRDA तून कोणत्या राजकीय नेत्याच्या सांगण्यावरून अमितला खोट्या बिलांचे पैसे मिळायचे?
  • अमित चंडोळे कोणत्या राजकीय नेत्याच्या संपर्कात होता?
  • कोणत्या नेत्याचा अमित चंडोळेवर वरदहस्त होता?
  • टॉप्स सिक्युरिटीचा काळा पैसा अमित चंडोळेमार्फत कोणत्या राजकीय नेत्याला मिळत होता?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER