कृष्णकुंजवर कापला ‘पाकिस्तानी-बांगलादेशी घुसखोरांनो चालते व्हा’ लिहिलेला केक

mns Prashant Rane birthday Cake

मुंबई :- ‘पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांनो चालते व्हा’ असे लिहिलेला केक कृष्णकुंजवर कापण्यात आला.

मनसेचे नेते अमित राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कृष्णकुंज इथे मनसे वर्सोवा शाखा अध्यक्ष प्रशांत राणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. प्रशांत राणे यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त हा केक तयार केला होता. अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत तो केक कापण्यात आला.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, मनसे घुसखोरांच्या मुद्द्यावर सध्या आक्रमक झाली आहे. विविध माध्यमातून ते या घुसखोरांच्या विरोधात राग व्यक्त करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे महामेळाव्यात पाकिस्तानी- बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कडक भूमिका जाहीर केली आहे. मुंबई उपनगर आणि पनवेल परिसरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बांगलादेशी घुसखोरांना देशातून निघून जाण्याचा इशारा दिला आहे. वर्सोवा आणि पनवेलच्या काही भागात पाकिस्तानी – बांगलादेशी परत जा, असे फलक लावण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वी वसई-विरामधील अर्नाळ्यात २३ बांगलादेश नागरिकांना पकडण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी ठाण्यातही चार बांगलादेशी नागरिकांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्या घुसखोरांजवळ बांगलादेशचा पासपोर्टही सापडला होता.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घुसखोर पाकिस्तानी- बांगलादेशींना देशातून हुसकावून लावण्याच्या मागणीसाठी ९ फेब्रुवारीला मोर्चा काढला होता. त्याआधी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक परिसरात ‘ बांगलादेशींनो चालते व्हा’ असा इशारा देणारे फलक लावले आहेत.