जिल्ह्या परिषदेत भाजपची सत्ता राखण्यासाठी परिचारक-मोहिते पाटील जोडी सज्ज

Prashant Paricharak-Mohite Patil

पंढरपूर : पंढरपूर पोटनिवडणुकीकडे (Pandharpur by election) २०२४च्या विधानसभा निवडणुकीची लिटमस चाचणी म्हणून पाहिले जात होते. या पोटनिवडणुकीतील विजयानंतर सोलापूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे स्थान अधिक मजबूत करण्यासाठी विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) आणि रणजितसिंह मोहिते पाटील (Mohite Patil) ही जोडी एकमेकांच्या हातात हात घालून कामाला लागले आहेत. त्यांची ही राजकीय मैत्री अधिक घट्ट आणि मजबूत व्हावी यासाठी पंढरपूर येथील मोहिते पाटील समर्थक अमोल नागटिळक यांनी प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते आणि समाधान आवताडे या तिन्ही भाजप आमदारांना आज एकत्रित आणून त्यांचा एकाच तुळशीच्या हारात सत्कार केला.

२०१४ मध्ये राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आले. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली परिचारक आणि मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. एकमेकांपासून दुरावलेले परिचारक-मोहिते पुन्हा या निमित्ताने एकत्र आले. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकीत परिचारक-मोहिते पाटीलांनी एकत्रित काम केले. त्यामुळे प्रथमच जिल्हा परिषदेवर भाजप प्रणित गटाची सत्ता आली. ती कायम ठेवण्यासाठी परिचारक आणि मोहिते यांचे कायम प्रयत्न सुरु आहेत.

पंढरपूर पोटनिवडणुकीमध्ये परिचारक-मोहिते यशस्वी झाले. त्यामुळे राज्यातील आणि केंद्रातील भारतीय जनता पक्षातील नेत्यांमध्ये या दोघा आमदारांचा दबदबा आणखीनच वाढला आहे. पोटनिवडणुकीत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आमदार प्रशांत परिचारक यांच्या खांद्याला खांदा लावून समाधान आवताडे यांच्या विजयासाठी मोठी मेहनत घेतली.

मोहिते -परिचारकांच्या राजकीय ताकदीचा परिणाम म्हणूनच राष्ट्रवादीच्या जागेवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांचा विजय झाला. या विजयामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद दिसून आली तर महाविकास आघाडी सरकारला जनतेने नाकारल्याचे ही त्यांनी दाखवून दिले. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून प्रथमच अमोल नागटिळक यांनी या तिन्ही आमदारांचा एकत्र सत्कार केला. पुढच्या काळात तिघा आमदारांनी एकत्रीत येवून जिल्ह्याच्या विकासाला चालना द्यावी अशी, अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button