
मराठी सिनेमा आणि विशेषतः नाटकातील भूमिकांमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या अभिनेता प्रशांत दामलेलाही (Prashant Damle) कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. गेल्या काही काळापासून जगभरातील कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी वरुण धवन आणि नीतू कपूर यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मराठीतीलही काही कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. आणि आता प्रशांत दामलेही कोरोनाच्या विळख्यात सापडला असला तरी तो काठावर आहे. स्वतः प्रशांतनेच सोशल मीडियावर कोरोना काठावर असल्याचे सांगितले आहे.
प्रशांतने त्याच्या फेसबुकवर याबाबत माहिती दिली आहे. कोरोनाची लागण झाल्याने प्रशांतने ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचे प्रयोग रद्द करण्यात आले आहेत. प्रशांतने व्हीडियो पोस्टमध्ये म्हटले आहे, “गेल्या रविवारी चिंचवडला मी नाटकाचा प्रयोग केला तेव्हा मला थोडी कणकण वाटत होती. म्हणून मी बुधवारी कोरोना टेस्ट करुन घेतली. त्यात मी काठावर पास झालो. तसा काठावर पास मी शाळेपासूनच आहे. पण हा काठ जरा डेंजर आहे. त्यामुळे डॉक्टर म्हणाले की, काठावर जरी असलात तरीही सात दिवसांच्या आयसोलेशनमध्ये तुम्हाला जावे लागेल. म्हणून मी बुधवारपासून सात दिवसांच्या आयसोलेशनमध्ये आहे. त्यामुळे शनिवार दुपारचा बोरीवलीचा प्रयोग आणि रविवार दुपारचा गडकरी रंगायतनचा प्रयोग रद्द करावा लागला आहे. सध्या मी ठणठणीत आहे. पण डॉक्टरांनी सात दिवसांची विश्रांती घ्यावीच लागेल असे सांगितल्याने मी काम करू शकत नाही. मात्र दिलासादायक गोष्ट म्हणजे माझे सगळे सहकलाकार, बॅक स्टेजचे आर्टिस्ट ठणठणीत आहेत. मीच थोडासा काठावर आहे. काठावरचा मी थोडासा मागे येतो आणि परत काम सुरु करतो. मी काळजी घेतो तुम्हीही काळजी घ्या. असेही प्रशांतने पोस्टमध्ये म्हटले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला