‘ब्लॅकमेलर’ म्हटल्याप्रकरणी आमदार बंब यांचा शिरसाट यांच्यावर ५० कोटीचा दावा

Prashant Bomb- Sanjay Shirsat.jpg

औरंगाबाद : बीड बायपास रस्ता रुंदीकरण ३८३ कोटी रूपयांच्या कामात गैरव्यहराची तक्रार करणारे आमदार प्रशांत बंब (Prashant Bomb) ‘ब्लॅकमेलर’ असल्याचा आरोप करणारे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याप्रकरणी बंब यांनी शिरसाट यांच्यावर ५० कोटीचा दावा करणारी अवमानाची नोटीस बजावली आहे. १५ दिवसात सर्व आरोप मागे घेऊन विनाशर्त माफी मागा अन्यथा न्यायालयात भेटा, असा इशारा देण्यात आला आहे.

बीड बायपास रस्त्याच्या नुतनीकरणाच्या कामाची गरज नसल्याचे आमदार प्रशांत बंब यांचे मत आहे. ठेकेदाराकडूनच याची दुरूस्ती केली असती तर सार्वजनिक बांधकाम खात्याला फार तर ४० कोटी रूपयात उर्वरीत काम करता आले असते, असे बंब यांचे मत होते. याबाबत त्यांनी शासनाच्या विविध विभागांना तक्रारही केली होती. हा रस्ता पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांच्या मतदारसंघातून जातो. शिरसाट यांनी ठेकेदाराला ब्लॅकमेल करून पैसे उकळण्यासाठी बंब आक्षेप घेत असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी आमदार बंब यानी अंड.सागर लड़ा यांच्या मार्फत शिरसाट यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.

याबाबत बंब म्हणाले की, तुम्ही मला ब्लॅकमेलर म्हंटले आहे. चुकीच्या कामाच्या तक्रारी करून मी पैश्यांची मागणी करतो आणि तडजोड करून प्रकरण संपवत असल्याचा तुम्ही आरोप केला आहे. मात्र, हे आरोप बिनबुडाचे असून यातून माझी सार्वजनिक प्रतिमा मलीन झाली आहे. लोकप्रतिनिधींवर आरोप करण्याची ही पद्धत चुकीची आहे. उलट माझ्या तक्रारींमुळे राज्यातील अनेक घोटाळे उघडकीस आले असून चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा झाली आहे. याबाबत मानहानीचा खटला दाखल करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. आमदार शिरसाट यांनी केलेल्या मान/प्रतिष्ठेच्या हानीसाठी ३० कोटी रुपए, मानसिक छळ, शारिरीक पीडेसाठी १० कोटी, कुटूंबात पत घातल्याबद्दल ९.९८ कोटी तर न्यायालयीन खर्चासाठी २ लाख रुपए असे नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाईची मागणी बंब यांनी नोटीशीत केली आहे.

‘माफी मागा’…

या प्रकरणी आ.शिरसाट यांनी सोशल मिडीयावरील पोस्ट तसेच अन्य ठिकाणी प्रसिद्ध केलेला बदनामीकारक मजकूर मागे घ्यावा. विनाशर्त माफी मागावी, केवळ माफी मागून भागणार नाही तर आरोपांचे पुरावे नसल्याचे जाहीर करावे. ज्या माध्यमात ज्या पद्धतीने बदनामी केली. त्याच ठिकाणी, त्याच जागेवर माफी मागा. येत्या १५ दिवसात माफी मागितली नाही तर अवमानाच्या खटल्याना सामोरे जाण्याचा इशारा आमदार बंब यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER