मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कट्टीबट्टीचा डाव खेळत आहेत; प्रसाद लाड यांची टीका

मुंबई :- सध्या राज्यात ब्रुक फार्मा प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात चर्चेचे वातावरण आहे. यावरून भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कट्टीबट्टीचा डाव खेळत आहेत. यासाठीच भाजपवर (BJP) आरोप होत आहेत, असा दावा लाड (Prasad Lad) यांनी केला.

आमदार प्रसाद लाड यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी दावा केला आहे की, “महाराष्ट्रातील जनतेसाठी ५० हजार रेमडेसिवीर औषधांचा पुरवठा करण्याचे श्रेय भाजपला मिळू नये, यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी राजकारण केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे बालिश राजकारण थांबवावे. मुख्यमंत्र्यांच्या या खेळामुळे निष्पाप लोक आपला जीव गमावत आहेत, याची जाणीव सरकारने ठेवावी.” असे लाड म्हणाले.

श्रेय भाजपला मिळू नये
राज्यातील कोरोनाची बिकट परिस्थिती लक्षात घेता, सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य म्हणून भाजपाने राज्य सरकारला, ५० हजार रेमडेसिवीर पुरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. रेमडेसिवीरचा साठा सरकारकडे सुपूर्द केला जाईल, असे भाजपने आधीच स्पष्ट केले होते. प्रवीण दरेकर आणि मी दमणला जाऊन ब्रुक फार्माच्या कंपनीला भेट दिली आणि त्यांच्यापुढे प्रस्ताव ठेवला. अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) यांनाही आवश्यक परवानगी मिळविण्यासाठी संपर्क साधला. तसेच यासाठी अन्न व औषध प्रशासनाने परवनागीही दिली. दमणच्या औषध प्रशासनाकडूनही परवनागी मिळाली. याबाबतची माहिती मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनाही दिली. मात्र, या उपक्रमाचे श्रेय भाजपाला देऊ नये, या संकुचित विचारसरणीमुळे आघाडी सरकारने शेवटच्या क्षणी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्याला धमकावले आणि चौकशीचे आवाहन केले, असा आरोप लाड यांनी केला.

गृहमंत्र्यांचे वर्तन अनपेक्षित
महाराष्ट्राकडून ११ कंपन्यांना रेमडेसिवीर विक्रीची परवानगी दिली गेली. यात ब्रुक फार्मा कंपनीचेही नाव आहे. या कंपनीकडे ६० हजार औषधांच्या कुप्यांचा साठा आहे, असा आरोप पोलिसांनी केला. मात्र, ४८ तास उलटूनही हा साठा कुठे आहे, या प्रश्नावर सरकार निरुत्तर झाले आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी राजेंद्र शिंगणे किंवा फडणवीस यांच्याकडून कोणतीही माहिती न घेता गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली आहे. गृहमंत्र्यांचे हे वर्तन पूर्णत: अनपेक्षित आहे. “सत्ताधाऱ्यांच्या धमकीला आम्ही घाबरत नाही. जनतेच्या कल्याणासाठी आमच्यावर कितीही गुन्हे दाखल केले तरी चालतील.” असे लाड म्हणाले.

महाराष्ट्रात रेमडेसिवीरसाठी रुग्णांची फरफट होत आहे. सरकारने सद्य:स्थितीचे भान ठेवावे, राजकारण बाजूला ठेवून जनतेचा विचार करावा. यासाठी विरोधकांकडे जर चांगल्या योजना असतील तर त्याची माहिती घेऊन एकत्रित काम करावे आणि राज्याला या संकटातून बाहेर काढावे, असेही आवाहनही लाड यांनी केले.

ही बातमी पण वाचा : नवाब मालिकांचे आरोप शिवसेनेने फेटाळले  ; खासदार राहुल शेवाळे म्हणाले केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वोतपरी मदत 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button