भाजप-मनसे युतीचे संकेत, भाजप नेत्याची राज ठाकरेंसोबत महत्वपूर्ण चर्चा

मुंबई : पुढच्या वर्षी होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. एकीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (NCP) एकत्रित निवडणूक लढण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे भाजपनेही (BJP) शिवसेनेला (Shivsena) शह देण्यासाठी राज ठाकरेंच्या मनसेला (MNS) जवळ करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. त्याचाच पहिला प्रयत्न म्हणून भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली.

आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात असले तरी, येत्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेची जवळीक वाढत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यानिमित्ताने ही भेट तर नाही ना असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

प्रसाद लाड यांनी जवळपास पाऊण तास राज ठाकरेयांच्याशी चर्चा केली. कृष्णकुंजवरुन बाहेर पडताच प्रसाद लाड यांनी भारतीय जनता पार्टीचा निर्धार, मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा, अशी बोलकी प्रतिक्रिया दिली. मात्र यावेळी प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्यासोबतची भेट ही वैयक्तिक होती असं नमूद केलं. माझे आणि राज ठाकरे यांचे वैयक्तिक संबंध आहेत, असं प्रसाद लाड म्हणाले.

शिवसेनेची परंपरागत सत्ता खाली करण्यासाठी जे करता येईल ते करु, भाजपसोबत कोणी यायला तयार असेल तर त्यांचं स्वागत असेल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. विशेष म्हणजे लाड यांना त्यांच्या गाडीपर्यंत सोडायला अमित ठाकरे आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

दरम्यान, शिवसेनेने भाजपची साथ सोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जवळ केल्यानंतर, भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. मुंबई महापालिकेतील शिवसेनेची सत्ता उलथवून टाकण्याचा निर्धार भाजपने केला आहे. भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीसाठीचं ‘भाजप येणार, मुंबई घडवणार’ हे घोषवाक्य जाहीर केलं आहे. तसेच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा मुंबई सेवा सेतूचं उद्घाटन केलं आहे. आजवर सेनेचा मुंबई महानगरपालिकेचा किल्ला अभेद्य राहिला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नाकावर टिच्चून महानगरपालिकेची आगामी निवडणूक जिंकायचीच, असा चंग यंदा भाजपने बांधला आहे. मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवण्याचा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेची जवळीक वाढताना दिसून येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER