प्रार्थना रंगली रंगात

Prarthana Behere

कलाकारांचा अभिनय तर ऑनस्क्रिन दिसत असतोच. तर त्यांच्यातील नृत्य आणि गाण्याची कला सेलिब्रिटींच्या रिअॅलिेटी शोच्या स्टेजवर बहरून येतानाही आपण पाहतो. पण यापलीकडेही कलाकारांमध्ये असे अनेक कलागुण असतात की ज्यांना कॅमेरासमोर जागा मिळत नाही तेव्हा मग त्यांच्या छंदांना फुलवण्यासाठी फ्रि टाइम धावून येतो. गेल्यावर्षी कोरोनामुळे (Corona) लॉकडाउन (Lockdown) सुरू होतं तेव्हा आपण आपल्या आवडत्या कलाकारांचे अनेक छंद सोशलमीडिया पेजवर पाहिले. यामध्ये कुणी रेसिपीज केल्या तर कुणी गिटारवादन करून चाहत्यांशी संवाद साधला. तर अशा या बहुगुणी कलाकारांमध्ये अभिनेत्री प्रार्थना बेहरेही (Prarthana Behere) आहे बरं का. नुकतीच ती रंगात रंगून गेली. नव्हे ओ, होळीच्या रंगात नव्हे तर चित्रकारीतेच्या रंगात. तिच्या कुंचल्याने घरातील एक रिकामी भिंत मस्त रंगली.

प्रार्थना बेहरेने नुकताच एक व्हिडिओ तिच्या सोशलमीडियापेजवर पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या घरातील प्लेन भिंतीवर चित्र काढताना दिसली. प्रार्थना उत्तम अभिनय करते हे तर माहिती आहेच. तिला खूप छान डान्स येतो हेदेखील तिच्या चाहत्यांपर्यंत पोहोचलं आहे. चला हवा येऊ द्या या शोमध्ये तिच्या सातकप्पी हसण्यावरही प्रचंड विनोद केले आहेत. आता प्रार्थनाच्या चित्रकारीतेलाही चाहत्यांनी दाद दिली आहे.

प्रार्थना सांगते, घरातील एक भिेंत नेहमी मला नेहमी खुणावत होती. गच्चीतली ही भिंत तशीच प्लेन होती. बऱ्याच दिवसांपासून माझ्या मनात हा विचार होता की या भिंतीला छान डेकोरेट करावं. तसा वॉलपेपरचा पर्याय होता. पण माझ्यातील चित्रकार मला काही गप्पं बसू देईना. लॉकडाउनमध्येच मला हे काम करायचं होतं, पण त्याच्यासाठी लागणारे रंग आणि साहित्य आणायला बाहेर वातावरण योग्य नव्हतं. गेल्या आठवड्यात पुन्हा ही रिकामी भिंत पाहिली आणि मग मात्र चित्रकारीतेचं भूत चांगलंच चढलं. बघता बघता या प्लेन भिंतीवर फुलापानांची छान नक्षी तयार झाली. प्रार्थनाने रंगवलेल्या या भिंतीवरील चित्रासाठी तिच्या सोशल मीडिया पेजवर चाहत्यांनी कमेंटचे रंग तर उधळले आहेतच पण प्रार्थनाच्या हातातील ही कला पाहून तिचे चाहते खुश झाले आहेत.

बडोद्याची पोरगी असलेल्या प्रार्थनाने गेल्या काही वर्षात हिंदी आणि मराठी अभिनयक्षेत्रात चांगलाच ठसा उमटवला आहे. पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतून प्रार्थनाने चाहत्यांची वाहवा मिळवली. मराठी सिनेमांमध्ये बोल्ड नायिकांचा ट्रेंड आला त्यात प्रार्थनाचा लूक आणि अभिनय याने कमाल केली.

स्वप्नील जोशीसोबतच्या मितवा सिनेमात सेकंड रोल असूनही ती भाव खाऊन गेली. ती आणि ती, कॉफी आणि बरच काही, वॉटसअप लग्न, मिस्टर अँड मिसेस सदाचारी यासारख्या सिनेमातून मांडलेल्या तरूणाईच्या जगातील विविध विषयांना प्रार्थनाच्या अभिनयाने योग्य न्याय दिला. अभिनय कारकीर्द लोकप्रियतेच्या शिखरावर असताना अभिषेक जावकरसोबत प्रार्थनाने लग्न केलं. लॉकडाउननंतर छूमंतर या सिनेमाच्या शूटिंगसाठी प्रार्थनाने लंडनमधील अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. तर जागतिक महिला दिनानिमित्त प्रार्थनाने केलेल्या कष्टकरी महिलांच्या रूपातील लूकमधील फोटो खूप व्हायरल झाले.

समाजातील कष्टकरी महिलांसाठी खऱ्या
अर्थाने महिला दिन ही संकल्पना रूजली पाहिजे अशी कॅप्शन देत प्रार्थनाने केलेल्या या अनोख्या फोटोशूटने ती चर्चेत आली होती. अभिनय, संसार, भटकंती, फोटोसेशन आणि तिचे छंद असं सगळं काही बॅलेन्स करत प्रार्थनाची चित्रकारीही रंगात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button