राजू शेट्टींना वंचित बहुजन आघाडीच योग्य पर्याय?

Prakash Ambedkar-Raju Shetty

मुंबई : नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघाटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. शेट्टी यांचा पराभव संघटनेतील कार्यकर्त्यांसाठी चिंतेचा विषय झालेला आहे. परंतु, याला डगमगून न जाता आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागली आहे. त्यांची काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत चर्चा देखील सुरू आहे. मात्र राजू शेट्टींसाठीवंचित बहुजन आघाडीच जवळचा पर्याय असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या मत विभाजनामुळे राजू शेट्टी यांचा दारुण पराभव झाला होता. लोकसभेला राजू शेट्टी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसोबत एकत्र होते. आता विधानसभेला देखील शेट्टी यांनी आघाडीसोबत जाण्याची तयारी सुरू केली असली तरी प्रकाश आंबेडकर आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीमुळे शेट्टी यांची धाव नेमकी कुणीकडे असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. तसेच शेट्टी यांनी वंचितला सोबत घेतले तर आघाडीत येईल असा इशाराही दिला होता.

राजू शेट्टी यांनी आघाडीकडे ३५ जागांची मागणी केली आहे. मात्र त्यांना आघाडी ३५ जागा देतील यावर शंका आहे. परंतु राजू शेट्टी वंचितसमोबत गेल्यास त्यांना ३५ जागा मिळू शकतात. याचा लाभ पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी होणार आहे. त्यामुळे शेट्टी यांच्यासाठी तरी आघाडीपेक्षा वंचितचा पर्यायच जवळचा आहे.