प्रकाश आंबेडकरांमुळे बहुजन समाजाचे वर्चस्व निर्माण होणार ?

prakash ambedkar

मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना सत्तेबाहेर लोटण्यासाठी देशातील सर्वच प्रमुख पक्षांनी जय्यत तयारी केली आहे. देशातील समविचारी पक्षांनी एकत्र येत भाजपला बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी महाआघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे; पण नेतृत्वावरून अद्याप ही महाआघाडी स्थापन झालेली नाही. असे असले तरी राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित निवडणूक लढणार हे जवळपास निश्चित झाले आहे. या आघाडीत महाराष्ट्रातील प्रमुख दलित नेते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सहभागी व्हावे, अशी इच्छा दोन्ही पक्षांनी व्यक्त केली आहे.

ही बातमी पण वाचा : आंबेडकरांनी एमआयएमला सोडून महाआघाडीत यावे – अशोक चव्हाण

तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात पुन्हा एकदा बहुजन समाजाचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी मोठी खेळी केली आहे. एकेकाळी राज्यातील राजकारणात बहुजन समाजाच्या नेत्यांचे प्रभुत्व होते. समाजाचे नेते रा. सू . गवई, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, प्रकाश आंबेडकर हे एकाच पक्षात असताना राज्यातील बहुजन समाज एकवटलेला होता. मात्र सत्तेच्या नादापायी या नेत्यांमध्ये फूट पडली आणि सर्व नेत्यांनी आपापले पक्ष स्थापन करीत राजकारण करू लागले. प्रकाश आंबेडकर यांनी १९९९ साली भारिप-बहुजन महासंघाची स्थापना करून बहुजन समाजाला एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांना काही प्रमाणात यशही मिळाले. सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार बहुजन समाजाला एकत्र आणण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांना एक मोठी संधी मिळाली आहे; कारण आगामी विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी प्रकाश आंबेडकर महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. हे लक्षात येताच त्यांनी दोन्ही काँग्रेसला बाजूला सारत एमआयएमला सोबत घेऊन बहुजन वंचित आघाडी स्थापन केली. ही आघाडी लक्षवेधक ठरत असून, त्यांनी दोन्ही काँग्रेस पक्षाला कात्रीत पकडले आहे. विधानसभेआधी लोकसभेची निवडणूक होणार असल्याने आंबेडकर यांनी आपल्या पक्षाला आठ जागा दिल्यास आघाडीत सहभागी होऊ, अशी अट घातलेली आहे. त्यांच्या या अटीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतेत भर पडली आहे. दोन्ही काँग्रेसला भाजपचा विजयरथ रोखायचा असेल तर प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणे भाग आहे. त्यामुळे आंबेडकरांनी मागितलेल्या आठ जागा देणे बंधनकारक असणार आहे. यावरूनच आंबेडकर पुन्हा एकदा राज्यात बहुजन समाजाचे वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत .

ही बातमी पण वाचा:- शरद पवारांविरोधात बहुजन वंचित आघाडीचा उमेदवार उभा राहणार – प्रकाश आंबेडकर

आघाडीने लोकसभेसाठी आंबेडकरांना आठ जागा देऊ केल्या तर निश्चितच प्रकाश आंबेडकरांचा पक्ष राष्ट्रीय पातळीवर ओळखला जाईल. त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही प्रकाश आंबेडकर आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी अधिकच्या जागा मागू शकतात. राज्यात सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या अटी मान्य करू शकतात. हेच हेरून आंबेडकर यांनी सत्तेसोबतच बहुजन समाजाला एकत्र आणण्याची मोठी खेळी खेळली आहे. मात्र त्यांच्या या प्रयत्नांना राज्यातील बहुजन समाज किती मदत करणार हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळू शकेल.

विजय गावंडे