एमआयएमसाठी सर्व दरवाजे खुले आहेत : प्रकाश आंबेडकर

लातूर : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एआयएमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीची युती तुटल्याची घोषणा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी जाहीर केली होती. मात्र आता चित बहुजन आघाडीची युती पुन्हा होण्याची दाट शक्यता आहे . एमआयएमसाठी सर्व दरवाजे खुले असून ज्यांनी दरवाजे बंद केले होते त्यांनीच ते खोलावेत असे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले . ते लातूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आमच्या समितीशी संपर्क साधून चर्चा करावी त्यातून नक्कीच योग्य मार्ग निघेल असा विश्वासही आंबेडकर यांनी व्यक्त केला. लोकसभेत वंचित आघाडीला मिळालेली मते ही नॉन मुस्लिम होती. वंचित आघाडी ही राज्यातील 1 कोटी 40 लाख मतदारांपर्यंत पोहोचली असून आणखी 20 ते 25 लाख मतदारांपर्यंत पुढील 10 ते 12 दिवसात पोहचून राज्याची पुढील सत्ता मिळवू, असा दावाही आंबेडकर यांनी केला .

दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या चर्चेदरम्यान एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीतील दुफळी बाहेर येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर सन्मानजनक जागा न दिल्याने एमआयएमने वेगळे होण्याचा निर्णय घेत युती तुटल्याची घोषणा केली होती. “२८८ पैकी ८ जागा एमआयएमसाठी सोडत असल्याने युती तोडत आहे.” असे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले होते. तसेच “वंचितसोबतची युती तोडण्याचा मोठा निर्णय मी पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या परवानगीशिवाय घेऊ शकत नाही. हा निर्णय पक्षाचे अध्यक्ष ओवेसी यांनीच घेतला आहे.” असे जलील म्हणाले होते.