आरक्षण : मराठा नेत्यांनी संयम बाळगावा – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar

पुणे : मराठा समाजाच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय गुंतागुंतीचा करू नये, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले आहे. मराठा नेत्यांनी थोडा संयम बाळगावा. या विषयात अधिक गोंधळ वाढला तर राज्यातील आरक्षणही गमवायची वेळ येऊ शकते, असा इशारा आंबेडकर यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिला.

ओबीसी समाजाने (OBC) मोठं मन करुन मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करुन घ्यावे, असे काही नेत्यांचे म्हणणे आहे. यावरच्या प्रश्नाला उत्तर देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “मी जे काही सोशल मीडियावर वाचतो आहे त्यावरुन हेच दिसते की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे मात्र आमच्या ताटातले नको, अशी ओबीसी समाजाची भूमिका आहे. त्यामुळे माझे सर्व मराठा नेत्यांना आवाहन आहे की, त्यांनी हा वाद अधिक गुंतागुंतीचा करू नये. मराठा नेत्यांनी ओबीसीमध्ये हिस्सा मागण्याच्या भानगडीत पडू नये.

मराठा समाज हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. मराठा समाज महाराष्ट्रात जरी १६ टक्के असला तरी देशात तो फक्त २ टक्के आहे. त्यामुळे देशभरातील ओबीसी जर एकत्र आले तर मराठा समाजाला जे महाराष्ट्रापुरते मिळणारे आरक्षण आहे तेही मिळणार नाही. म्हणून, सुप्रीम कोर्टाच्या एका स्टे ऑर्डरने मराठा समाजाने घाबरुन जाऊन नये, असा सल्ला आंबेडकर यांनी दिला.

मराठा आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणीला आल्यास मुंबई हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्ट कायम ठेवेल त्यामुळे निकाल मराठा समाजाच्याच बाजूने लागेल. सुप्रीम कोर्ट मागणी मान्य करण्याच्या स्थितीत आहे. त्याला खो घालू नका, अशी सर्व मराठा नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विनंती आहे, असे आंबेडकर म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER