‘वंचित’शी आघाडी करण्यास बच्चू कडू सकारात्मक; प्रकाश आंबेडकरांशी केली चर्चा

Prakash Ambedkar-Bachchu Kadu.jpg

नागपूर : आगामी विधानसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीशी एकत्रित लढण्यास प्रहार जनशक्तीचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून त्यांनी गुरुवारी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची नागपुरातील रविभवन येथे भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. मात्र ही बैठक अतिशय गुप्त असल्याने बैठकीत नेमक्या कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली याची माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, ही बैठक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असली तरी या बैठकीत कोणत्याही युती किंवा आघाडीबाबत चर्चा झाली नाही. केवळ पक्षाच्या चिन्हाबाबत चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली.

VBA

लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीच्या उमेदवारांनी चांगली मते मिळवली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतदेखील चांगले यश मिळणार असल्याचा अंदाज वंचित आघाडीने वर्तवला आहे. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी वंचित आघाडीने लोकसभेत असलेल्या कपबशी चिन्हाचीच मागणी केली आहे. मात्र हे चिन्ह विधानसभेला प्रहार जनशक्ती पक्षाला म्हणजे बच्चू कडू यांच्या पक्षाला जाणार आहे. यासाठी मतांचं विभाजन होऊ नये म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी बच्चू कडू यांच्याकडे चिन्हाची मागणी केली असल्याची माहिती पुढे आली आहे.

ही बातमी पण वाचा : नोकरीचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक , वंचित आघाडीच्या नेत्यावर गुन्हा

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने राज्यात ४८ जागा लढवल्या होत्या. त्यांना एकूण मतांच्या टक्केवारीनुसार ७.२ टक्के मते मिळाली होती. जर वंचित आघाडीला ८ टक्के मते मिळाली असती तर त्यांना राज्यस्तरीय नोंदणीकृत पार्टी म्हणून मान्यता मिळाली असती. सध्या वंचितला कपबशीशिवाय चहा गोड लागणार नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी कपबशी या चिन्हासाठी नवीन समीकरण स्वीकारण्याची सुरुवात केली आहे; कारण सामान्य नागरिक अथवा ग्रामीण भागातला मतदार हा चिन्हावरून पक्ष ओळखत असतो. त्यामुळे जर वंचितचे चिन्ह बदलले तर याचा फटका वंचितला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आपले कपबशी चिन्ह कायम ठेवण्यासाठी बच्चू कडूंशी तडजोड करणार आहेत.

ही बातमी पण वाचा : १५ ऑगस्टनंतर वंचितचे उमेदवार जाहीर करू, प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला शेवटचा अल्टिमेटम!