नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देण्यास प्रकाश आंबेडकरांचाही विरोध

Prakash Ambedkar - MaharashtraToday

नवी मुंबई :- नवी मुंबई येथील विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी ठाणे, नवी मुंबई व रायगड जिल्ह्यांसह इतरही अन्य ठिकाणच्या स्थानिक भूमिपुत्रांनी लावून धरली आहे. आज भिवंडीत सकाळी ११ ते १२ या वेळेत ठिकठिकाणी संघर्ष समिती व स्थानिक भूमिपुत्रांनी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे यासाठी मानवी साखळी आंदोलन केले. आता त्यात वंचित बहुजन आघाडीनेही उडी घेतली आहे. नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव द्यायला हवे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली आहे.

नवी मुंबई येथे अंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. या विमानतळासाठी रायगड जिल्ह्यातील उलवे कोपर, पनवेल या पट्ट्यातील मूळ रहिवासी आणि भूमिपुत्र असलेल्या आगरी-कोळी बांधवांनी जमीन दिली आहे. या नागरिकांनी इथलेच भूमिपुत्र असलेल्या दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला द्यावे अशी जोरदार मागणी केलेली आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव सिडकोने संमत केला आहे. परंतु विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी स्थानिक भूमिपुत्रांनी केली आहे.

वंचित बहुजन आघाडीकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, नवी मुंबईच्या इतिहासात दि. बा. पाटील यांचे बहुमोल असे योगदान राहिले आहे. नवी मुंबईसाठी ज्या भूमिपुत्रांनी जमीन दिली, त्या प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी जो लढा झाला, त्याचे नेतृत्व दिबांनी केले होते. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातदेखील दिबांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

ओबीसींच्या जागृती व हक्कांसाठी संघटित झालेल्या ओबीसी चळवळीचे ते लढाऊ नेते होते. पनवेलचे नगराध्यक्षपद भूषवलेल्या दि. बा. पाटील यांनी लोकसभेत चार वेळेस रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषविले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक भूमिपुत्रांची समाजभूषण दिबांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी अत्यंत रास्त आणि न्याय्य आहे. पूर्वजांकडून मिळालेल्या प्राणप्रिय जमिनी विमानतळासाठी दान देणाऱ्या भूमिपुत्रांच्या भावनांची कदर राज्यकर्त्यांनी केली पाहिजे. त्यामुळे नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रसिद्धिपत्रकाच्या माध्यमातून केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button