शिवनेरीच्या पायथ्याशी प्राजक्ताचा सूर्यनमस्कार

Prajkta mali

चित्रीकरणाच्या निमित्ताने अभिनयाच्या संधीपलीकडे कलाकारांना काय मिळते या प्रश्नाची खूप उत्तरे असतील, पण या घडीला अभिनेत्री प्राजक्ता माळीला (Prajakta Mali) जर हा प्रश्न विचारला तर ती नक्कीच म्हणेल, की मुंबई पुण्यात सिमेंटच्या जंगलात जो मोकळा श्वास मिळणार नाही, तो मला सध्या शूटिंगच्या निमित्ताने मिळतोय. खरं आहे. कारण सध्या प्राजक्ता तिच्या एका सिनेमाच्या शूटिंगसाठी शिवनेरीच्या पायथ्याशी आहे आणि शूटिंगसाठी केलेल्या मुक्कामातील प्रत्येक सकाळी ती शिवनेरीच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात सूर्यनमस्काराचा आनंद घेत आहे. पक्की नेटकरी असलेल्या प्राजक्ताने हा क्षण तिच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केला नसता तरच नवल.

खरंतर प्राजक्ता मुळची पुण्याची. ती अनेकदा सहलीच्या निमित्ताने, भटकंतीच्या निमित्ताने पुण्याच्या आसपास असलेल्या गड-किल्ल्यांवर गेली आहे. शिवाय पुण्याला ऐतिहासिक वारसा आहे, परंपरा आहे तीदेखील तिला लहानपणापासून माहित आहे. तिच्याच शब्दात सांगायचं तर आता पुण्याची शांतता, निसर्गरम्यता हरवली आहे. प्रदूषण आणि वाहनांची प्रचंड वर्दळ यामुळे पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गडकिल्यांभोवतीची निसर्गसंपदा टिकली पाहिजे. त्यामुळेच जेव्हा एका नव्या सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने मला शिवनेरीच्या पायथ्याशी जायला मिळणार याचा आनंद मला त्या नव्या सिनेमाच्या ऑफरपेक्षा जास्त झाला. सध्या मी जुन्नर परिसरात शिवनेरीच्या पायथ्याशी शूटिंग करतेय. यासाठी आमची टीम इथे राहिली असल्याने या मुक्कामातील सकाळ माझ्यासाठी पर्वणी होती. त्यामुळेच मी शिवनेरीच्या पायथ्याशी लागलेल्या आमच्या सेटभोवतीची एक शांत जागा हेरली आणि भल्या सकाळी सूर्यनमस्काराचे समाधान मिळवले.

प्राजक्ताला निसर्गात रमायला नेहमीच आवडते. त्यामुळे शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरीच्याभोवती असलेल्या निसर्गरम्य भटकंतीसाठीही प्राजक्ताची पावले वळली. एरव्हीदेखील प्राजक्ता तिच्या सौंदर्यासाठी आयुर्वेदिक उपाय करत असते. निसर्गाविषयी जाणून घेण्यासाठी ती नेहमीच उत्सुक असते. तिच्या पुण्यातील घराभोवतीही तिने अगदी जातीने लक्ष देऊन बाग फुलवली आहे. आता कामाच्या निमित्ताने तिला मुंबईत रहावे लागत असले तरी शूटिंगचे स्पॉट निसर्गाच्या सानिध्यात आहेत का याचा ती नेहमीच शूटिंगच्या युनिटकडून कानोसा घेत असते. सध्या ती ज्या सिनेमाचे शूटिंग करत आहे, त्यासाठी तिला शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या निसर्गऱम्य ठिकाणी जायला मिळणार याचा खूप आनंद झाला होता. सूर्यनमस्कार घालून तिने जेव्हा मान वर करून शिवनेरी गडाकडे पाहिले त्या क्षणाचाही फोटो तिने शेअर केला आहे. इतकेच नव्हे तर शिवनेरीच्या परिसरातही प्राजक्ताने मनसोक्त भटकंती केली. या भागात नैसर्गिकरित्या उगवलेली अनेक फुलझाडे आहेत. त्या फुलझाडांसोबतही प्राजक्ताने खूप फोटोसेशन केले. मोगऱ्याच्या फुलांनी लगडलेल्या झाडासोबत प्राजक्ताने काढलेला फोटो आणि त्याला, मोगऱ्यासोबत पारिजातक अशी हटके कॅप्शन देत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.

लॉकडाउनमध्येही प्राजक्ताने सोशल मीडियापेजच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला होता. यामध्ये लॉकडाउनकाळात प्रत्येकाचेच रूटीन बदलून गेले होते. प्रतिकारशक्ती वाढवण्याचे आव्हान होते. त्या काळात प्राजक्ताने तिच्या काही टिप्स व्हिडिओद्वारे शेअर केल्या होत्या. शिवाय मस्त महाराष्ट्र या शोमधून प्राजक्ताने केलेली भटकंती तिला तर आवडलीच पण तिच्या चाहत्यांनाही ती वेगळ्या रूपात भेटली. सध्या तरी तिने शिवनेरीच्या पायथ्याशी घातलेल्या सूर्यनमस्काराचे फोटो आणि किस्से तिच्या फॅनक्लबमध्ये हिट आहेत.

अभिनय, नृत्य, निवेदन, फॅशन शो, स्टाइल अशा प्रत्येक क्षेत्रात प्राजक्ताने तिचा बोलबाला ठेवला आहे. जुळूनी येती रेशीमगाठी या मालिकेतील मेघना देसाई या भूमिकेने प्राजक्ता घराघरात पोहोचली. त्याआधी रूंजी या मालिकेत एका छोट्याशा भूमिकेतही प्राजक्ता दिसली होती. सुवासिनी या मालिकेतील तिचा मराठमोळा लूक फारच गाजला. आणि डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमात सुबोधसोबत नाचणारी गोमू प्राजक्ताच्या नृत्याने क्लिक झाली. हास्य जत्रा या कॉमेडीचे शोचे निवेदन करणारी प्राजक्ता तिच्या हजर-जबाबीपणासोबतच तिच्या एकसे एक स्टाइल स्टेटमेंटमुळेही आकर्षित ठरली. याच शोमध्ये तिच्या ड्रेस डिझायनरसोबत झालेल्या वादाने प्राजक्ता चर्चेत आली होती. पण सध्या हा वाद मिटला आहे. आता प्राजक्ताच्या सूर्यनमस्कारावर मात्र तिच्या चाहत्यांनी कौतुकाची बरसात केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER