प्राजक्ताने घेतली अनाथांच्या माईची भेट

Prajakta Gaikwad

सेलिब्रिटी कलाकार जेव्हा समाजातील एखाद्या संस्थेच्या मदतीसाठी आवाहन करतात तेव्हा त्यांची हाक त्यांच्या लाखो करोडो फॉलोअर्सपर्यंत पोहोचत असते. कलाकारांनाही या गोष्टीचे नेहमीच समाधान मिळत असते. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील येसूबाई ही भूमिका लोकप्रिय करणारया प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) हिने जेव्हा सहज म्हणून अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणार्या सिंधूताई सपकाळ यांच्या संस्थेला भेट दिली. पण तिथे गेल्यानंतर भारावून गेलेल्या प्राजक्ताने त्या संस्थेतील अनाथांना मदत करण्याचे आवाहन करताच सिंधूताईंकडे मदतीचा ओघ वाढला आहे.

प्राजक्ताने नुकतीच सिंधुताईंच्या पुण्यातील संस्थेला भेट दिली. खरं तर ही भेट अगदी सहज होती. पण जेव्हा प्राजक्ता सिंधुताईंच्या अनाथ आश्रमात पोहोचली तेव्हा तेथील लहानमोठय़ा अनाथांना पाहून ती भावूक झाली. सिंधुताईंसोबत गप्पा मारताना तिच्या असे लक्षात आले की या संस्थेतील अनाथांना मदतीची गरज आहे. लगेच प्राजक्ताने एक व्हिडिओ शेअर करत जास्तीत जास्त प्रमाणात या संस्थेला मदत करण्याचे आवाहन प्राजक्ताने केले. वैशिष्टय़ म्हणजे प्राजक्ताच्या चाहत्यांकडून सिंधुताईंना मदत मिळण्यास सुरूवातही झाली.

प्राजक्ता सांगते, गेल्या आठ महिन्यांपासून या आश्रमातील अनाथांपर्यंत कोणतीही मदत पोहोलली नव्हती. कोरोनामुळे मदत पोहोचवण्याचे सगळे मार्ग थांबल्यामुळे या संस्थेत खूप विचित्र समस्या निर्माण झाली होती. एक स्त्री अनाथ मुलांचा सांभाळ करते हे पाहून मला खूप भारावल्यासारखे झाले. सिंधुताईंच्या संस्थेतील मुलांच्या रोजच्या जेवणाच्या खर्चासाठी आर्थिक तरतूद करावी लागत असल्याची माहिती सिंधुताईंकडून कळाली. सिंधुताई सर्वत्र भाषण करत असतात. व्याख्यानं देत असतात, त्यातून मिळणाऱ्या मानधनाच्या रकमेतून त्या आश्रम चालवतात. मात्र कोरोना लॉकडाउन काळात व्याख्यानांचे कार्यक्रम नसल्याने सिंधुताईंसमोर आश्रमातील खर्च कसा चालवायचा याचा प्रश्न उभा होता. जर माझ्या एका आवाहनामुळे मदतीचा ओघ वाढणार असेल एक कलाकार म्हणून मला आनंदच आहे. केवळ पडद्यावर एखाद्या महापुरूषाची, इतिहासातील एखादय़ा प्रेरणादायी व्यक्तीची भूमिका करणे, ती लोकप्रिय करणे यापलीकडे माणूस म्हणून माझ्या आयुष्यात जर ही संधी आली असेल तर त्याचे मी सोने करेन.

प्राजक्ता गायकवाड ही कॉलेजजीवनात अभिनयाकडे वळली. प्राजक्ता मुळची पुण्याची असल्याने पुण्यातील अनेक नाट्यसंस्थांमधील हौशी रंगकर्मी तिच्या परिचयाचे होते. तिला शालेय वयात चांगली नाटकं पाहण्याची सवय लागली. नांदा सौख्य भरे ही तिची पहिली मालिका. या मालिकेत ती नायिका ऋतुजाच्या बहिणीची भूमिकेत दिसली होती. त्यानंतर स्वराजरक्षक छत्रपती संभाजी या मालिकेत तिला संधी मिळाली. या मालिकेतील महाराणी येसूबाई ही भूमिका अत्यंत लोकप्रिय झाली की तिला सगळय़ा महाराष्ट्राने डोक्यावर घेतले. आई माझी काळूबाई या मालिकेत प्राजक्ता आर्याच्या भूमिकेत नव्या रूपात दिसली पण मालिका सुरू झाल्यानंतर दीड महिन्यातच तिचा निर्मात्या अलका कुबल यांच्याशी वाद झाल्याने ती चर्चेत आली. अखेर ही मालिकाच प्राजक्ताने सोडली. यंदाचा पुण्यातील जिजामाता पुरस्कारही तिला मिळाला. अभिनेत्री म्हणून प्राजक्ताचा चाहतावर्ग आहेच पण तिने सिंधुताईंची भेट घेऊन त्यांच्या आश्रमासाठी केलेल्या मदतीच्या आवाहनामुळे तिच्या चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचाही वर्षाव केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER