प्राजक्ताला आठवली ती दहा मिनिटे

Prajakta Gaikwad-Aai Majhi Kalubai

महाराणी येसूबाईच्या ऐतिहासिक भूमिकेनंतर आता ‘आई माझी काळूबाई’ (Aai Majhi Kalubai) या मालिकेतील आर्याची व्यक्तिरेखा अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) साकारत आहे. आर्या ही एक कॉलेज गर्ल असल्याने प्राजक्ताच्या खऱ्या आयुष्याशी ही भूमिका मिळतीजुळती आहे. एकीकडे मालिकेतही ती कॉलेज स्टुडंट आहे आणि खऱ्या आयुष्यातही ती इंजिनीअरिंगची डिग्रीकोर्स करत आहे. सध्या कोरोनामुळे अनेक परीक्षांचा मुद्दा चर्चेत आल्यामुळे तिलाही तिच्या इंजिनीअरिंगच्या परीक्षेचा एक अविस्मणीय किस्सा आठवला.

प्राजक्ताचा अभिनय असलेली ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मालिका खूप गाजली. तिने वठवलेल्या येसूबाईला अनेक प्रेक्षकांची दाद मिळाली. प्राजक्ताला अकरावीत असतानाच मालिकेत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे अभ्यास करत अभिनय करण्याची किल्ली तिला बरोबर सापडली आहे. प्राजक्ताला मुळातच अभ्यासाची खूप आवड आहे. अभिनयाचे स्वप्न पाहात असली तरी शिक्षणालाही तिने कायम प्राधान्य दिले आहे. दहावीत तिला ९२ टक्के मार्क मिळाल्यानंतर तिने सायन्समधून अकरावीसाठी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. अकरावीची लिस्ट जाहीर झाली आणि तिला ‘नांदा सौख्य भरे’ ही मालिका मिळाली. अर्थात ही संधी तिला सोडायची नव्हती. मग काय, प्राजक्ताने फर्ग्युसनचे अॅडमिशन कॅन्सल केले आणि डिप्लोमा इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला. संभाजी मालिकेसाठी निवड झाली तेव्हा इंजिनीअरिंगचा डिग्री कोर्स सुरू झाला होता.  त्यामुळे अटेंडन्ससाठी सवलत होती. मालिकेच्या शूटिंगसाठी मुंबईत आणि कॉलेजचा काही प्रोजेक्ट असेल तर पुण्यात असा तिचा प्रवास सुरू होता.

इंजिनीअरिंगच्या एका सेमिस्टरच्या परीक्षेसाठी तिला पुण्यात यायचं होतं. तेव्हा संभाजी मालिका हिट होती. येसूबाई म्हणून प्राजक्ताला अख्खा महाराष्ट्र ओळखत होता. प्राजक्ता सांगते, जेव्हा मी पेपर देण्यासाठी कॉलेजकडे जायला निघाली तेव्हा ही बातमी कुठून कशी पसरली माहिती नाही, पण माझ्यामागे गर्दी खूप झाली. मी सांगितलं की, माझा पेपर आहे, पेपर झाल्यावर मी सर्वांना भेटेन; पण कुणीच ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हतं. मग काय, व्हायचं तेच झालं आणि मला पेपरला जायला दहा ते पंधरा मिनिटे उशीर झाला. पण तेव्हा मला दहा मिनिटे वाढवून देण्याचा निर्णय त्या परीक्षा व्यवस्थापनाने घेतला. क्षेत्र कोणतंही असू दे, आपण जेव्हा चांगलं काम करत असतो तेव्हा परीक्षेसारख्या नियमाच्या बंधनात असलेल्या व्यवस्थेकडूनही आपल्याला सहकार्य मिळू शकतं.

प्राजक्ता म्हणाली, हा किस्सा मला आत्ता आठवायचं कारण म्हणजे ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतही असाच एक सीन दाखवण्यात आला आहे. मी परीक्षेला जात असतानाच वाटेत एक अपघात होताना मला दिसतो आणि त्यातील जखमीला मी दवाखान्यात नेण्याचे ठरवते. माझ्यासोबतची मैत्रीण म्हणते की, अगं आपली परीक्षा आहे आणि हे तू काय करतेस? पण, परीक्षा काय पुढच्या वर्षीही देता येईल; पण याचा जीव वाचणे महत्त्वाचे आहे, असे मी तिला उत्तर देते. शिक्षण म्हणजे फक्त परीक्षा, मार्क इतकेच नसून तुम्ही माणूस म्हणून कसे वागता हे शिक्षण तुम्हाला शिकवत असेल तर तुम्ही आयुष्याच्या परीक्षेत नेहमीच टॉप येता हा धडा मला या सीनमधून मिळाला. सध्या अनेक विद्यार्थी कोरोनामुळे रखडलेल्या परीक्षा, निकाल, नवी प्रवेशप्रक्रिया यामुळे चिंतेत आहेत. त्यांना मला सांगायचे आहे की, नक्कीच कोरोनामुळे सगळं बदलून गेलं असलं तरी संयम ठेवा.

सध्याची तरुणाई परीक्षा कधी होणार याकडे लक्ष लावून बसली आहे. स्पर्धा परीक्षा असोत किंवा इंजिनीअरिंग, मेडिकलच्या फायनल परीक्षेचाही प्रश्न कोरोनामध्ये अडकून पडला होता. अंतिम वर्षाच्या परीक्षा अखेर होणार असल्याने विद्यार्थ्यांसमोरील चिंता तरी मिटली आहे. कोरोनामुळे काय झालं असा प्रश्न जर कुणालाही विचारला तर प्रत्येकाकडे त्याचं उत्तर आहे. कोरोनामुळे अनेक गोष्टी बंद आहेत, त्यापैकीच एक कॉलेजही. मार्चपासून बंद झालेले कॉलेज नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली तरी अधांतरी आहेत. प्राजक्ताला हे सगळं बघून तिच्या कॉलेजचे अंतिम वर्ष, परीक्षा आणि वाढवून मिळालेली ती दहा मिनिटे हा किस्सा आठवलाच; पण सध्याच्या तरुणांच्या मनाची अवस्था पाहून ती अस्वस्थही झाली.

ही बातमी पण वाचा : मराठीनेच दिली अभिनयाची संधी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER