प्राजक्ताने भरवला आंबा महोत्सव

Prajakta Mali

एप्रिलची चाहूल लागली की प्रत्येकालाच आंबा खावासा वाटतो. मग सुरू होते ती आंबा खाण्याची तयारी. त्यासाठी आंबा खरेदीलाही उधाण येतं. अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिनेही आंबा खाण्यासाठी चक्क घरी आंबा महोत्सव साजरा केला. इट राइट असा नारा देत प्राजक्ताने दर्जेदार आंबा खाण्याची हौस भागवून घेतली. नेमका प्राजक्ताचा हा आंबा महोत्सव काय होता याची चर्चा तिच्या चाहत्यांमध्ये रंगली नसती तरच नवल.

स्माइल क्वीन या नावाने मनोरंजन इंडस्ट्रीत ओळखली जाणारी प्राजक्ता जरी तिच्या डाएटबाबत चोख असली तरी जे सिझनल आहे ते खाण्यासाठीही तिचा नेहमीच आग्रह असतो. अभिनय, नृत्य, निवेदन, भटकंती अशा प्रत्येक गोष्टीची आवड जपत प्राजक्ता पक्की खवय्यी आहे. मस्त महाराष्ट्र या शोच्या निमित्ताने प्राजक्ता जेव्हा रत्नागिरीच्या पर्यटनाला गेली होती तेव्हा तिने तेथील आंबा शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. किसान कनेक्ट या उपक्रमातून चांगला आंबा ग्राहकांपर्यंत पोहचवला जातो त्याची माहिती घेतली होती. आता जेव्हा आंब्याचा सिझन सुरू झाला तेव्हा तिने कोकणातून आठ ते दहा प्रकारच्या जातीचे आंबे मागवले आणि मग काय विचारता, प्राजक्ताच्या पुण्याच्या घरी आंबा महोत्सवच रंगला. मुळात प्राजक्ताचे पुण्यातील घर हे आजूबाजूला अंगण, झाडे असलेलं आहे. नुकताच तिने आपल्या पुण्यातील घराभोवती असलेल्या झाडांचा फोटो शेअर केला आहे. अशा घरात राहणं हे माझ्यासाठी भाग्याचं आहे असंही तिनं पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्यामुळे आंबा महोत्सवाच्या निमित्ताने प्राजक्ताने घरच्यांना थेट कोकणातील आंबे खिलवले आहेत.

फक्त आंबे मागवून आणि महोत्सवासारखे ते घरात मांडून त्यावर यथेच्छ ताव मारून प्राजक्ता गप्प बसली नाही. कोणत्याही विषयाच्या खोलाशी जायचं हा तिचा स्वभावच आहे. अनेकदा आंबा खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आंब्याबाबत फसवणूक होत असल्याचं ऐकायला मिळतं. हापूसच्या नावावरही अनेकदा ग्राहकांना हलक्या दर्जाचा माल दिला जातो. कुणी तरी एक विक्रेता असं करतो; पण ग्राहक आंबा घेताना गोंधळलेले असतात. या बाबतीतही प्राजक्ताने खास माहिती जाणून घेतली. चांगला आंबा कसा ओळखायचा, आंब्यातील पोषकमूल्य कोणती, आंबा कशा पद्धतीने खावा, आहारात आंब्याचे काय महत्त्व आहे याची माहिती प्राजक्ताने तिच्या सोशल मीडिया पेजच्या माध्यमातून ऑनलाईन संवादाद्वारे तिच्या चाहत्यांपर्यंत पोहचवली.

नेहमीच काही तरी हटके करण्यात प्राजक्ता आघाडीवर असते. त्यामुळे तिने भरवलेला आंबा महोत्सवही हटके होता. जेव्हा तिने आंबा महोत्सव असं म्हणत फोटो पोस्ट केले तेव्हा तिच्या चाहत्यांना वाटलं की प्राजक्ता खरंच एका मोठ्या मैदानावर आंबा महोत्सव भरवतेय की काय… पण, तसं नव्हतं. दोन वर्षांपूर्वी अभिनेते संजय मोने आणि अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांनी त्यांच्या कलाकार मित्रमंडळींसाठी आमरस-पुरीचा बेत आखला होता. आता प्राजक्ताने आंबा महोत्सव केला असेल असा समज सुरुवातीला झाला; पण घरच्यांसाठी थेट आंबा शेतकऱ्यांकडून आंबे मागवून तिने हा सोहळा साजरा केला.

लॉकडाऊन काळातही प्राजक्ताने काही खास व्हिडीओ बनवले होते ज्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यावी, शरीराची काळजी कशी घ्यावी या व्हिडीओंचा समावेश होता. आता तिच्या आंबे महोत्सवाबरोबरच आंब्याची निवड कशी करावी, आणि आंबे खाण्याचे महत्त्व काय या माहितीमुळे प्राजक्ताचे तिच्या चाहत्यांमध्ये कौतुक होत आहे.

‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतील मेघनाच्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली प्राजक्ता सध्या ‘हास्यजत्रा’ या शोचे निवेदन करत आहे. याशिवाय सिनेमा, नाटक आणि मालिका या तीनही माध्यमांतील प्राजक्ताची मुशाफिरी कौतुकास्पद आहे. सध्या तरी तिच्या आंबा महोत्सवाचे रंग सोशल मीडियावर रंगले आहेत.

ही बातमी पण वाचा : अस्मिताला लागणार खूळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button