प्राची देसाई म्हणते राजकारणात जसा भ्रष्टाचार तसाच बॉलिवूडमध्ये वंशवाद

Maharashtra Today

२००८ मध्ये ‘रॉक ऑन’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केलेल्या प्राची देसाईने (Prachi Desai) काही मोठे सिनेमे, मोठ्या नायकांबरोबर केले पण तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही. ती यशासाठी चाचपडतच राहिली. आता ४ वर्षाच्या गॅपनंतर प्राची देसाई पुन्हा एकदा लाईट्स, कॅमेरा, अॅक्शनचा सामना करणार आहे. पण यावेळी ती मोठ्या पडद्यासाठी अभिनय करणार नसून छोट्या पडद्यावर म्हणजेच वेबसीरीजसाठी अभिनय करणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मने अनेक कलाकारांना रोजी रोटी आणि यश दिले असल्याने ओटीटीवर (OTT) कलाकारांची मांदियाळी दिसत आहे. त्यात आता प्राची देसाईची भर पडणार आहे. या वेबसीरीजच्या निमित्ताने बोलताना प्राचीने प्रथमच बॉलिवूडमधील वंशवादावर वक्तव्य केले. प्राचीने म्हटले की, राजकारणात जसा भ्रष्टाचार आहे त्याच प्रकारे बॉलिवूडमध्ये वंशवाद आहे.

प्राचीने आतापर्यंत बोल बच्चन, लाइफ पार्टनर, तेरी मेरी कहानी, आय, मी और मैं, पोलिसगिरी, वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई, अझहर सिनेमात काम केले आहे, २०१७ मध्ये आलेल्या कार्बन सिनेमातही ती दिसली होती. आता प्राची वेब सीरीज सायलेंसमध्ये काम करताना दिसणार आहे. या वेबसीरीजच्या निमित्ताने प्राचीने पत्रकारांसोबत गप्पा मारल्या. यावेळी प्राचीने वंशवादासह बॉलिवूडपासून दूर राहाण्याचे कारणही सांगितले. बॉलिवूडमधील वंशवादाबाबत बोलताना प्राची म्हणाली, ‘मी एवढेच म्हणेन की, राजकारणात जसा भ्रष्टाचार आहे अगदी तशाच प्रकारे बॉलिवूडमध्ये वंशवाद आहे. या गोष्टीला नाकारण्यात काहीही अर्थ नाही. अनेकांना प्रचंड संघर्ष करूनही काम मिळत नाही. पण आता ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे सगळ्यांना काम मिळत आहे असेही प्राची म्हणाली.

बॉलिवूडपासून अनेक वर्ष दूर राहाण्याचे कारण विचारले असता प्राची म्हणाली, ‘फार कमी वयात मी काम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर सतत मी काम करीत होते. त्यात त्याच कामापासून सुटका व्हावी त्यामुळे कामातून ब्रेक घेण्याचा विचार मी केला होता. ब्रेक घेऊन काहीतरी नवीन करण्याचा विचार मी करीत होते. त्याच वेळी मला या वेबसीरीजची ऑफर आली आणि मी लगेच होकार दिला. ही एक वेगळी वेबसीरीज असून माझे कामही वेगळे आहे. यात मी एका पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका साकारीत आहे. प्रेक्षकांना माझे काम नक्कीच आवडेल असेही प्राचीने सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER