ठाकरी बाण्याचा पाया रचणाऱ्या प्रबोधनकारांनीही स्थापन केली होती ‘स्वयंसेवक सेना’

Prabodhankars who formed the foundation of Thackeray's banya had also established 'Swayamsevak Sena' ...

प्रबोधनकार ठाकरे (Prabodhankar Thackeray) अर्थात केशव सीताराम ठाकरे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनेक महान समाजसुधारकांचं योगदान आहे. त्यातलं महत्त्वाचं व वेगळं नाव म्हणजे प्रबोधनकार ठाकरे. आज ज्या ठाकरे बाण्याला आपण बाळासाहेब ठाकरेंमुळं(Balasaheb Thackeray) ओळखतो त्या ठाकरे बाण्याचा पाया रचला तो प्रबोधनकारांनी. आपल्या लेखनातून त्यांनी ही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.

खडतर प्रवास
प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म १७ सप्टेंबर १८८५ मध्ये पनवेल येथे झाला. पूर्वीच्या काळात ठाकरे घराण्याला ‘धोडपकर’ म्हणून ओळखले जात असे. कारण ठाकरे घराण्याच्या मूळ पुरुषाकडे धोडप (चांदवड) किल्ल्याची सरदारकी होती. त्यांचं बऱ्यापैकी बालपण पनवेल भागातच गेलं. त्यांचे पहिली ते चौथीचे शिक्षण पनवेलच्या मराठी शाळेतच झाले. केशवरावांनी डिस्ट्रिक प्लीडरची परीक्षा द्यावी व पनवेल येथे प्रॅक्टीस करावी अशी त्यांच्या आईची इच्छी होती. कोर्टात बेलीफ म्हणून काम करणाऱ्या त्यांच्या वडिलांनी म्हणजे सीताराम ठाकरे यांनी आपली बदली पनवेलहून कल्याणला करून घेतली. परंतु एकदा मोखाड्याच्या जंगलात आजारी पडल्याने सीताराम ठाकरे न्यायालयात हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांची नोकरी गेली आणि आर्थिक परिस्थिती खालावत गेली.

१९०३ मध्ये प्लेगच्या साथीत वडील सीताराम ठाकरे यांचे निधन झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी केशवरावांवर येऊन पडली. कुटुंबाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी रबरी स्टँपचा व्यवसाय सुरू केला. दरम्यान मॅट्रिकच्या परीक्षेसाठी फी भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांना मॅट्रिक पास करता आलं नाही. परंतु त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आपली ओळख बनवायला सुरुवात केली होती. स्वदेशी चळवळीच्या काळात आर्यन हायस्कूलचे शिक्षक वामनराव रामचंद्र जोशी यांनी स्वदेशी प्रचारिणी सभा स्थापन केली होती. या सभेत केशवरावांनी जोरदार भाषणं केली आणि पट्टीचा वक्ता म्हणून आपले नाव कमावले.

केशव सीताराम ठाकरे ते प्रबोधनकार
१६ ऑक्टोबर १९२१ रोजी मुंबई येथून ‘प्रबोधन’ या पाक्षिक नियतकालिकाचे प्रकाशन त्यांनी केले. या अंकाच्या पहिल्या पानावर शाईच्या दौतीमध्ये बुडालेली लेखणी, उगवता सूर्य आणि तलवार असलेला प्रबोधनचा लोगो छापलेला होता. लोगोखाली इंग्रजीत ‘हिंदू समाजाच्या सामाजिक, धार्मिक आणि नैतिक उन्नतीसाठी वाहिलेले पाक्षिक’ असे लिहिलेले प्रबोधनचे ध्येयवाक्य होते.

या नियतकालिकातून प्रबोधनकारांनी समाजातील वाईट चालीरीतींवर प्रहार केला. कालांतराने ऑक्टोबर १९२३ पासून प्रबोधन पाक्षिक स्वरूपात सातारा जिल्ह्यातील पाडळी येथून निघत होते.

१९२५ मध्ये प्रबोधन पुण्यात स्थलांतरित झाले. प्रबोधन पाक्षिकातून केशव सीताराम ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या वैचारिक आणि सामाजिक क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा निर्माण केला. लोकहितवादी असतानाच स्वतंत्र मतवादी असण्यातून त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. आणि महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रात त्यांना प्रबोधनकार म्हणून ओळखले जाऊ लागले. १९३० ला अंक प्रकाशित झाला नाही. प्रबोधनचा अंक बंद पडल्यावर पुरुषोत्तम बाळकृष्ण कुलकर्णी यांच्या ‘नवा मनू’ साप्ताहिकात लिहिण्यास सुरुवात केली. त्यांनी ‘तात्या पंतोजीच्या छड्या’ या मथळ्याखाली अनेक टीकात्मक लेख लिहिले. त्यांनी कुणाची भीड न बाळगता आपला ठाकरी बाणा तेवत ठेवला. शेवटी त्यांच्या या निर्भीड आणि रोखठोकपणावर प्रभावित होऊन राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना ‘कोंदड’ ही पदवी बहाल केली.

हिंदू धर्मातील वाईट चालीरीतींवर बोट ठेवत असताना त्यांना अनेक टीकांनाही सामोर जावं लागत होतं. पण त्यांनी आपलं काम सोडलं नाही. बाल-जरठ विवाहाला त्यांनी कडाडून विरोध केला. फक्त त्यांनी आपल्या लिखाणातूनच नाही तर प्रत्यक्ष कृतीतून आपला ठाकरी बाणा दाखवला. बाल-जरठ विवाह म्हणजे एका अल्पवयीन मुलीचे एका पन्नाशी पार झालेल्या म्हाताऱ्याशी लग्न लावण्याची प्रथा. यावर त्यांनी कडाडून विरोध केलाच; पण एका अशाच लग्नाच्या मंडपाला त्यांनी आग लावून आपला या प्रथेविरुद्धचा निषेध नोंदवला होता.

हिंदू धर्मातील वाईट चालीरीतींना विरोध करण्यासाठी त्यांनी एक सेना स्थापना केली. त्यांनी ‘हुंडा प्रतिबंधक स्वयंसेवक सेना’ स्थापन करून हुंडा पद्धतीच्या विरोधात एक मोहीमच उघडली होती. विशेष म्हणजे सर्व जातींमधील अशा वाईट प्रथांविरोधात त्यांनी आवाज उठवला. स्त्रीशक्तीचा सन्मान व्हावा अशी त्यांची धारणा होती. त्यानुसार त्यांनी भारतीय संस्कृतीप्रमाणे नवरात्र उत्सवाचे आयोजनही केले.

महाराष्ट्रात प्रबोधनकार ठाकरे नावाचा दबदबा लेखनातून व कार्यकर्तृत्वातून कायम राहिला. महाराष्ट्राच्या प्रगतिशील जडणघडणीत प्रबोधनकार ठाकरेंचं योगदान कुणालाही विसरता येणं शक्य नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER