प्रभास आजपासून मुंबईत ‘आदिपुरुष’चे शूटिंग सुरु करणार

prabhas

बाहुबली सिनेमामुळे प्रचंड लोकप्रिय झालेला अभिनेता प्रभास (Prabhas) दोन दिवसांपासून मुंबईत आहे. रविवारी बीकेसीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तो दिसला. प्रभास आता काही दिवसांसाठी मुंबईतच राहाणार असून तो आजपासून म्हणजे 1 मार्चपासून त्याचा ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित महत्वाकांक्षी सिनेमा ‘आदिपुरुष’चे शूटिंग सुरु करणार असल्याचे सांगितले जात आहे. शूटिंगसाठीच तो मुंबईत आला आहे. आदिपुरुष हा प्रभू श्रीरामांच्या जीवनावर आधारित सिनेमा असून प्रभास यात प्रभू श्रीरामांची भूमिका साकारत आहे. तर रावणाची भूमिका सैफ अली खान (Saif Ali Khan) साकारणार आहे.

‘आदिपुरुष’ची घोषणा झाल्यापासूनच हा सिनेमा संपूर्ण देशभरातील सिने इंडस्ट्रीमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. सैफ अली यात रावणाची भूमिका करीत असल्याने त्याने या सिनेमाबाबत बोलताना रावणाची भलामण केली होती. यासाठी सोशल मीडियावर तो ट्रोल होऊ लागल्यानंतर मात्र त्याने माफी मागून बोलण्याचा तसा उद्देश्य नसल्याचे म्हटले होते. या सिनेमाचा एक सेट गोरेगाव येथे लावण्यात आला होता. मात्र सेटवर आग लागली आणि संपूर्ण सेट जळून गेला होता. आता गोरेगावच्या फिल्मसिटीमध्ये या सिनेमासाठी भव्य सेट लावण्यात आलेला आहे. प्रभास बीकेसीतील एका हॉटेलबाहेर दिसला तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना त्याला पाहून आश्चर्य वाटले होते. मोबाईलने त्याचे फोटो काढण्यासाठी सगळ्यांची एकच धांदल उडाली होती. प्रभासचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेले आहेत. भूषण कुमार निर्मित हा सिनेमा पुढील वर्षी 11 ऑगस्ट 2022 ला रिलीज होणार आहे.

प्रभाससोबत साऊथचा आणखी एक सुपरस्टार विजय देवरकोंडाही (Vijay Devarkonda) मुंबईत त्याच्या नव्या ‘लाईगर’ सिनेमाच्या शूटिंगसाठी आला आहे. करण जोहर (Karan Johar) निर्मित या सिनेमात त्याची नायिका अनन्या पांडे (Ananya Pandey) आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER