फिर्यादी मुलीनेच ‘क्लीन चिट’ दिल्याने ‘पॉक्सो’ आरोपी निर्दोष

मुंबईतील खटल्याला अनपेक्षित कलाटणी

Court

मुंबई :- मी आरोपीला कधीही भेटलेली नाही. मी त्याला ओळखतही नाही. त्याने माझ्यावर अतिप्रसंग केला, असेही मी पोलिसांना कधी सांगितलेले नाही, अशी साक्ष देत फिर्यादी मुलीनेच ‘क्लीन चिट’ दिल्याने बलात्काराच्या आरोपावरून बालकांचे लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्यान्वये (Protection Of Children From Sexual Offences Act) भरलेल्या खटल्यातून मुंबईतील विशेष न्यायालयाने २४ वर्षीय आरोपीची निर्दोष मुक्तता केली. पुण्यात कर्वेनगरमध्ये राहणारा उमेश यानंदसिंग गिरासे नावाचा हा आरोपी मूळचा नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील पळसदरे गावचा आहे. विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश प्रीती कुमार (घुले) यांनी निर्दोष मुक्त करण्याआधी त्याला एक वर्ष तुरुंगात राहावे लागले होते.

अभियोग पक्षाने (Prosecution) मांडलेले कथानक घडले तेव्हा ही फिर्यादी मुलगी साडेसतरा वर्षांची होती व इयत्ता बारावीत शिकत होती. न्यायालयात साक्ष दिली तेव्हा वयाला १८ वर्षे पूर्ण होऊन ती सज्ञान झाली होती. अभियोग पक्षाच्या केसचा तिने पूर्णपणे इन्कार केला. एवढेच नव्हे तर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा कोणताही वैद्यकीय पुरावा कोर्टापुढे आला नाही. आपण साक्षीत काय सांगत आहोत हे पूर्ण जबाबदारीने समजण्याच्या वयाची ही फिर्यादी मुलगी असल्याने व तिच्या साक्षीने किंवा अन्य पुराव्यांनी आरोपीविरुद्धचे आरोप सिद्ध होण्यास कोणताही आधार दिसत नाही, असे न्यायाधीश प्रीती कुमार यांनी निकालपत्रात नमूद केले.

पोलिसांनी या मुलीचा जो जबाब नोंदविला होता तशीच जबानी तिने दंडाधिकार्‍यांपुढेही नोंदविल्याचे सांगून ती जबानीही कोर्टात सादर केली गेली होती. (Statement u/s 163 Cr.pc) परंतु त्याचाही इन्कार करताना या फिर्यादी मुलीने सांगितले की, पोलीस म्हणतात तशी कोणतीही माहिती मी दंडाधिकाऱ्यांना सांगितलेली नाही. मला फक्त उर्दू व इंग्रजी या दोनच भाषा येतात. माझी जबानी मराठीत नोंदवून काय लिहिले आहे हे मला समजावून न सांगताच माझी त्यावर स्वाक्षरी घेण्यात आली. अभियोग पक्षाचे म्हणणे असे होते : ही मुलगी गेल्या १२ जानेवारीस बहिणीशी भांडून, मैत्रिणीकडे जाण्यासाठी घराबाहेर पडली. रात्रीपर्यंत घरी आली नाही म्हणून निर्मल नगर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली गेली.

परंतु प्रत्यक्षात मैत्रिणीकडे न जाता ही मुलगी पुण्याला जाण्यासाठी दादरला जाऊन बसमध्ये बसली. आरोपी त्याच बसमध्ये प्रवास करत होता. वाटेत बस ‘ब्रेक डाऊन’ झाली. आरोपी व ही मुलगी बराच वेळ इकडे-तिकडे फिरून पुण्याला त्या मुलाच्या घरी गेली. नंतर तो तिला नाशिकला घेऊन गेला. तेथे एका हॉटेलात त्याने तिच्यावर बलात्कार केला. पण पोलिसांचे हे सर्व कथानक खोटे ठरवताना या मुलीने न्यायालयात सांगितले की, मी पुण्याला एका मैत्रिणीकडे जाण्यासाठी बसमध्ये बसले, पण बसमध्ये मला कोणीही मुलगा भेटला नाही. वाटेत बस एके ठिकाणी थांबली तेव्हा मी ‘वॉशरूम’ला गेले. तेथे मैत्रिणीचा पत्ता लिहून घेतलेला कागद हरवला. त्यामुळे पुण्याला पोहचल्यावर मैत्रिणीकडे न जाता एका हॉटेलात राहिले. पैसे संपल्यावर परत दादरला आले व तेथून चालत घरी गेले.

ही बातमी पण वाचा : परपुरुषापासून गरोदर पत्नीला पतीपासून झटपट घटस्फोट

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER