मुंबईत वीजपुरवठा खंडित होणं ही शरमेची बाब – माजी ऊर्जामंत्री

Chandrashekhar Bawankule

मुंबई :- राज्याची राजधानी मुंबईत (Mumbai) आज सकाळी अचानक वीज पुरवठा (Power Cut) ठप्प झाला होता. वीज ठप्प झाल्यामुळे मुंबईसह उपनगरामध्ये वीज पुरवठा खंडीत झाला होता. यावरून विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढले आहे.

माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राज्यसरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणा सतर्क न राहिल्यामुळेच मुंबई आणि लगतच्या भागातील वीजपुरवठा खंडित झाला. संबंधित यंत्रणांनी बिघाड वेळीच दुरुस्त करण्यात आला असता तर ही वेळ ओढावली नसती. महाराष्ट्रासारख्या आधुनिक तंत्रज्ञान असणाऱ्या राज्याच्यादृष्टीने इतक्या मोठ्याप्रमाणात तांत्रिक बिघाड होणे, ही दुर्दैवी बाब असल्याचे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.

आज सकाळी 10.10 च्या सुमारास मुंबईसह ठाण्यातील उपनगरांमध्ये वीज पुरवठा ठप्प झाला होता. मुंबई आणि उपनगरांमध्ये महावितरण, अदानी, बेस्टच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात येत असतो. एकाच वेळी तिन्ही वीज पुरवठा कंपन्यांकडून सेवा खंडीत झाली होती. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. मुंबईतील दादर, लोअर परळ, वरळी, भांडुप, दादर आणि बोरिवली परिसरात अचानक वीज पुरवठा बंद झाला होता. त्यानंतर हळूहळू संपूर्ण मुंबई आणि ठाण्यात वीज पुरवठा खंडीत झाल्याचे समोर आले. वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे अनेक ठिकाणी हॉटेल, कार्यालयांमध्ये वीज नसल्यामुळे अडचणींना सामोरं जावं लागत आहे.

वीज पुरवठा ठप्प झाल्यामुळे लोकल सेवेवरही परिणाम झाला होता. मध्य रेल्वे मार्गावरील लोकल ठप्प झाल्या होत्या. सर्व स्थानकांवर लोकल गाड्या गेल्या तीन तासांपासून जागच्या जागी थांबल्या होत्या. कुर्ला, दादर, डोंबिवली, कळवा स्थानकावर लोकल थांबलेल्या पाहण्यास मिळाल्या. त्याचबरोबर लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरही याचा परिणाम झाला होता. मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईतून जाणाऱ्या गाड्या स्थानकांवर थांबलेल्या होत्या.

दरम्यान, विजपुरवठा सुरळीत झाल्याची माहिती मिळत आहे.

ही बातमी पण वाचा : तासाभरात मुंबईतील वीजपुरवठा पूर्ववत होईल; उर्जामंत्र्यांचे आश्वासन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER