स्त्रीशक्तीची काळजी आयुर्वेदात भारी!

आजपासून शारदीय नवरात्राला (Navratri) सुरुवात झाली आहे. देवीची नऊ रूपे, नऊ शक्ती, त्या प्रत्येक रूपाचे वैशिष्ट्य या नऊ दिवसांत पुजले जाणार. आपल्या घरातील स्त्रीदेखील विविध भूमिका पार पाडत असते. स्त्री घरातील सर्वांचे आरोग्य, जेवणाच्या वेळा, शिस्त सांभाळणारी असते. पण बऱ्याच वेळा स्वतःकडे लक्ष राहात नाही. हळूहळू संधिवात, चिडचिडेपणा, मासिक पाळीच्या तक्रारी सुरू होतात. आयुर्वेदात स्त्री आरोग्य कसे चांगले ठेवता येईल हे विस्तृतपणे सांगितले आहे. वयाच्या वेगवेगळ्या पाडावामध्ये आयुर्वेदशास्त्र नक्कीच मदत करते.

सौंदर्य प्रसाधन (Cosmetics) – केस, त्वचा ते अगदी पायापर्यंत प्रत्येक अवयवाच्या सौंदर्याकरिता जेवढे लेप (पॅक), तेल, तूप औषध आयुर्वेद (Ayurved) शास्त्रात सांगितले आहे तेवढे कुठेच आढळत नाही. हर्बल उत्पादनांचे खूप मोठे मार्केट आयुर्वेदात वर्णित औषधींवर आहे. हे आपण बघतोच.

 

रजःस्वला परिचर्या – मासिक पाळी (Menstruation) सुरू झाल्यानंतर स्त्रियांनी त्या चार दिवसांत काय खावे, कशी काळजी घ्यावी हे आयुर्वेदात लिहिले आहे. ही काळजी घेण्यामागचा उद्देश एकच की, स्त्रियांना आयुष्यात कधीच गर्भाशयासंबंधी आजार होऊ नये. तिला हार्मोन्सविषयी तक्रारी उद्भवू नये. ही परिचर्या किंवा काळजी घेण्यामागचे कारण जाणून घेणे गरजेचे आहे; जेणेकरून मुलींना भविष्यातील आजारांपासून दूर ठेवू शकतो.

गर्भिणी परिचर्या (Pregnant care) – एक नवीन जीव आपल्या पोटात वाढण्याचा अनुभव फक्त आईच घेऊ शकते. किती मोठी देणगी आहे ही आणि जबाबदारीही! नवीन जीवाचे सर्व अवयव, त्याचे स्वास्थ्य हे त्या नऊ महिन्यांतच बनते. ही नैसर्गिक क्रिया आहे. त्यामुळे त्यावेळी काळजी कशी घ्यावी, कसा आहार घ्यावा हे शास्त्रशुद्ध सांगणारे आयुर्वेद आहे.

सूतिका परिचर्या (Maternity care) – बाळंतपण हा स्त्रीचा दुसरा जन्म असे म्हटले जाते. शरीर पुन्हा सामान्य स्थितीत येण्याकरिता, बाळाला स्तनपान व्यवस्थित होण्याकरिता व बाळाच्या योग्य वाढीकरिता आईचा आहारविहार सांगणारा आपला आयुर्वेद आहे. शतावरी कल्प दशमूलासारखी औषधे निर्माण विधी सांगणारे आयुर्वेदशास्त्र आहे.

 

अगदी पाळी सुरू झाल्यापासून पाळी बंद होण्यापर्यंत शरीरात होणाऱ्या बदलांची काळजी घेणारे आयुर्वेदशास्त्र आहे. या विविध स्थितींमध्ये आहारविहार, औषधी योजना, सौंदर्याची काळजी घेणारा आयुर्वेद आहे. योग्य प्रकारे जाणून घेतल्यास स्त्रियांचे स्वास्थ्य क्षण करणारे व विकारांची चिकित्सा करणारे आयुर्वेदशास्त्र आहे. नवरात्र आरंभाच्या दिवशी स्त्रीशक्तीला स्वस्थ ठेवण्याचा आयुर्वेदाचा हा दृष्टिकोन नक्कीच जाणून घेतला पाहिजे.

 

 

 

 

 

 

 

ह्या बातम्या पण वाचा : 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER