भांड्याला भांडे म्हणजे ऑल इज नॉट वेल…

Sitaram Kunte - Jayant Patil - Editorial

Shailendra Paranjapeसंसार म्हटला की भांड्याला भांड्याला लागायचंच… असं नेहमीच म्हटलं जातं. या लहानपणापासून ऐकलेल्या वचनाचा अर्थ असा आहे की, एखाद्या कुटुंबात नवरा-बायकोची भांडणं झाली तरी संसार मोडत नाही. आता भांड्याला भांडं लागायचंच, हे वाक्य आता आठवण्याचं कारण काय, तर राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत जलसंपदामंत्री जयंत पाटील भडकले आणि चक्क जलसंपदा खात्याची गरजच काय, बंद करून टाका खातं, अशी चिडचिड त्यांनी व्यक्त केली.

त्यांच्या चिडचिडीचं कारणंही स्वाभाविक होतं. त्यांच्या जलसंपदा विभागासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात मंजूर केलेल्या निधीसाठी एखादी फाईल पुन्हा अर्थ खात्याकडे कशाला पाठवायची, असा पाटील यांचा सवाल होता. राज्याचा अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतरही प्रत्येक विभाग मंजूर रकमा खर्ची घालतो; पण पाच कोटी रुपयांवर रक्कम असेल तर अर्थ खात्याची मंजुरी आवश्यक असते. त्यामुळे जयंत पाटलांच्या खात्याची फाईल मंजुरीसाठी पुन्हा पाठवावी लागल्याने जयंत पाटील चिडले होते.

ही सारी चिडचिड, त्यात जयंत पाटलांनी (Jayant Patil) राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांच्याबद्दलची वेळोवेळी व्यक्त केलेली नाराजी आणि त्यामागचं माजी सचिव विजय गौतम यांच्या नियुक्तीवरून झालेलं राजकारण आणि त्यातून जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांमध्ये असलेली अनबन, हेही कारण होतं. पण या सर्व कारणांमुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेली गरमागरमी माध्यमांपर्यंत पोहचली आणि त्याच्या बातम्याही आल्या. आता फायर फायटिंग करायचे तर रोजच्या रोज टीव्हीवर येऊन आसेतुहिमाचल घडणाऱ्या सर्व गोष्टींवर दैनंदिन शेरेबाजी करणाऱ्या शिवसेनेच्या संजय राऊत यांनीच बोलायला हवे. तसे ते बोलले आणि त्यांनी हा संसारात एकमेकांवर आपटल्या जाणाऱ्या भांड्यांचा उल्लेख केला आणि ते म्हणाले की, आमची भांडी काचेची नाहीत. त्यामुळे ती फुटणार नाहीत. एकीकडे मंत्रिमंडळात घडलेल्या गोष्टी बाहेर सांगायच्या नसतात, असं सांगून जयंत पाटलांनी वेळ मारून नेलीय तर दुसरीकडे अजित पवार यांनीही पुण्यात पत्रकारांना सांगून टाकले की, मंत्रिमंडळात काहीही बेबनाव नाही आणि जयंत पाटील कसे शांत स्वभावाचे आहेत. त्याउलट आपण कसे तापट आहोत, हे सांगायलाही अजित पवार विसरले नाहीत. आता शांत स्वभावाचे जयंत पाटील संतापले असतील, तर त्यांचा प्राणवायू नाही म्हटलं तर थोडा का होईना कमी झालाय, असाच अर्थ निघतो.

एक तर गृहमंत्रिपद, अर्थमंत्रिपद सांभाळलेल्या जयंत पाटलांना मिळालंय जलसंपदा खातं आणि त्यात प्रदेशाध्यक्ष असूनही रोजच्या रोज टीव्हीवर झळकतात ते नवाब मलिक, हे काही जयंत पाटलांना आनंदाचे डोही आनंद तरंग, असं वाटावं असं नक्कीच नाही. त्यामुळे त्यांच्यासारखा शांत स्वभावाचा विनोदबुद्धी असलेला माणूसही चिडू शकतो, तसंच झालं असणार.

राज्यात १९९५ मध्ये शिवसेना-भारतीय जनता पक्षांचं युती सरकार सत्तेवर आलं आणि गोपीनाथ मुंडे आणि मनोहर जोशी यांच्यातल्या नाराजी नाट्याच्या बातम्या अनेकदा छापून आल्या. तीच गोष्ट नंतरच्या १५ वर्षांच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्येही होत होतं. त्यामुळे वेळोवेळी दोन पक्षांमध्ये मतभिन्नता किंवा काही वाद होतच असतात, हा इतिहास आहे आणि तसे वाद होणं स्वाभाविकही आहे. पण त्याचा अर्थ लगेच संसार मोडणार असा निघत नाही किंवा उद्या लगेच घटस्फोट होणार असाही निघत नाही.

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांचा २५ वर्षांपेक्षा जास्ती काळ चाललेला संसार २०१४ च्या निवडणुकीच्या वेळी मोडला आणि निवडणुकीनंतर दोघांनाही पुन्हा एकत्र यावं लागलं. त्यानंतर या संसारातले तडे वाढत गेले आणि २०१९ ला पूर्ण घटस्फोट झाला. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला शिवसेना हा नवा संसार साथीदार आल्यानं ती आघाडीची महाआघाडी झालीय. आता लगेच या तिघांचा घटस्फोट होईल, असं म्हणणं योग्य नसलं तरी सध्या किमान ऑल इज नॉट वेल इतकं नक्कीच म्हणता येईल.

काही सकारात्मक…
पुण्याजवळ असलेल्या केडगाव इथल्या वरद विनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ. सचिन भांडवलकर यांनी एक स्वागतार्ह निर्णय त्यांच्या रुग्णालयापुरता जाहीर केलाय. आपल्या रुग्णालयात ज्या रुग्णाचे कोरोना उपचाराच्या काळात मरण होईल, त्या रुग्णाच्या उपचारांचा खर्च घेतला जाणार नाही, असं त्यांनी जाहीर केलंय. अर्थात, त्यांच्याविषयी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार डॉ. भांडवलकर पहिल्यांदाच असं काही करत नाहीयेत. गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेतही त्यांनी केवळ औषधोपचाराचे पैसे घेऊन काम करणारा डॉक्टर हा लौकिक मिळवला होता. त्यांच्या रुग्णालयातून बरे झालेल्या अनेक गरीब रुग्णांना त्यांनी बिलात सवलती दिल्या आहेत. वरद विनायक रुग्णालयात काम करतानाच ते दररोज जवळच्याच कोविड सेंटरमध्येही जाऊन रुग्णांवर उपचार करत आहेत. डॉ. भांडवलकरांचा आदर्श अनेक खासगी रुग्णालयांनी घ्यायला हवा आणि एक प्रकारे समाजाप्रती असलेल्या दायित्वाची साक्ष पटवून द्यावी.

शैलेंद्र परांजपे

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button