मंत्री, आमदारांवरील फौजदारी खटले काढून टाकण्यास स्थगिती

Karnataka High Court
  • कर्नाटक सरकारला हायकोर्टाकडून चाप

बंगळुरू: मंत्री व सत्ताधारी भाजपाच्या आमदारांवरील एकूण ६१ प्रलंबित असलेले फौजदारी खटले काढून घेण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयास तेथील उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यामुळे बी. एस. येदियुरप्पा (B. S. Yeddyurappa) यांच्या सरकारच्या मनमानी व स्वार्थी कारभारास चाप बसल्याचे मानले जात आहे. सरकारने हा निर्णय ३१  ऑगस्ट रोजी घेतला होता.

ज्यांच्याविरुद्धचे खटले मागे घेण्याचे ठरले त्यांत कायदामंत्री जे. सी. मधुस्वामी, पर्यटनमंत्री सी. टी. रवी व कृषिमंत्री बी. सी. पाटील यांच्यावरील खटल्यांचाही समावेश आहे. सरकारचा हा निर्णय कायद्याचे राज्य (Rule of Law) या संकल्पनेस हरताळ फासणारा आहे, असा आक्षेप घेत ‘पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज’ (PUCL) च्या कर्नाटक शाखेने त्याविरुद्ध जनहित याचिका केली आहे. प्राथमिक सुनावणी झाल्यानंतर मुख्य न्यायाधीश न्या. अभय ओक व न्या. विश्वजीत शेट्टी यांच्या खंडपीठाने ‘या निर्णयाच्या अनुषंगाने कोणताही पुढील पावले उचलली जाऊ नयेत’, असा आदेश दिला. सरकरला उत्तराचे प्रतिज्ञापत्र करण्यास सांगून पुढील सुनावणी २९ जानेवारी रोजी ठेवण्यात आली.

दंड प्रक्रिया संहितेतील कलम ३६१ अन्वये असलेला अधिकार वापरून सरकारने हा निर्णय घेतला. पण सुनावणीच्या वेळी झालेल्या चर्चेत मुख्य न्यायाधीश न्या.ओक म्हणाले की, सरकारने कलम ३६१ अन्वये हा निर्णय घेतला असला तरी जेथे हे खटले प्रलंबित आहेत त्या न्यायालयांवर तो बंधनकारक नाही. खटला मागे घेण्यास समर्थनीय आधार आहे की नाही हे तपासून पाहून मगच त्यासाठी अनुमती देणे न्यायालयांवर बंधनकारक आहे.

सरकारच्या या निर्णयानुसार आता संबंधित पब्लिक प्रॉसिक्युटरना खटला मागे घेण्यासाठी अर्ज करण्यास सांगण्यात येईषेल. परंतु त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने पूर्वी दिलेल्या एका निकालाचा दाखला देत मुख्य न्यायाधीश न्या. ओक म्हणाले की, सरकार सांगेल तसे वागायला पब्लिक प्रॉसिक्युटर हा काही सांगकाम्या नाही. सरकारने सांगितले तरी खटला मागे घेणे कितपत समर्थनीय आहे हे त्याने वस्तुनिष्ठपणे तपासायला हवे. योग्य वाटत नसेल तर त्याने नकार द्यायला हवा. तरीही सरकार आग्रही असेल तर त्याने त्या केसमधून माघार घ्यायला हवी.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER