शशी थरूर, राजदीप सरदेसाईंसह इतरांच्या संभाव्य अटकेला स्थगिती

rajdeep sardesai -shashi tharoor

नवी दिल्ली :- प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांच्या निदर्शनांच्या वेळी झालेल्या हिंसाचारासंबंधी इलेक्ट्रॉनिक व समाजमाध्यमांत चुकीच्या बातम्या आणि माहिती प्रसारित करून समाजात असंतोष पसरविल्याच्या आरोपावरून काँग्रेस नेते शशी थरूर व ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्यासह इतरांच्या संभाव्य अटकेला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी अंतरिम स्थगिती दिली.

थरूर, ‘इंडिया टूडे’चे, ‘दि कॅरावान’चे विनोद जोर्स यांच्याखेरीज मृणाल पांडे, जफर आगा, परेश नाथ व आनंद नाथ या पत्रकारांविरुद्ध  गुडगाव व नोएडा येथे गेल्या आठवड्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ते रद्द करावेत यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केल्या. सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे, न्या. ए. एस. बोपण्णा व न्या. व्ही. रामसुब्रह्मण्यन यांच्या खंडपीठाने प्रतिवादींना नोटिसा जारी करून दोन आठवड्यांनी त्यांचे उत्तर येईपर्यंत या सर्वांच्या संभाव्य अटकेला अंतरिम स्थगिती दिली.

याचिकाकर्त्यांनी कोणतीही प्रक्षोभक विधाने केलेली नाहीत. तरी त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे, असे त्यांच्यावतीने मुकुल रोहटगी व कपिल सिब्बल या ज्येष्ठ वकिलांनी सांगितले.

केव्हाही अटक होण्याची शक्यता असल्याने अंतरिम संरक्षण द्यावे, अशी त्यांनी विनंती केली. यावर सरन्यायाधीशांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना ‘तुम्ही खरंच या मंडळींना अटक करणार आहात का?’ असे विचारले. मेहता म्हणाले की, याचिकांवर उद्या (बुधवारी) सुनावणी घ्या. त्यांच्या विधानांनी किती मोठा प्रक्षोभ निर्माण झाला आहे, ते मी दाखवून देईन.

शेवटी सरन्यायाधीशांनी प्रतिवादींना नोटिसा काढल्या, सुनावणी दोन आठवड्यांनंतर ठेवली व तोपर्यंत सर्व याचिकाकर्त्यांना अटक केली जाऊ नये, असा आदेश दिला. निदर्शकांपैकी एक शेतकरी पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला, असे ट्विट सरदेसाई यांनी केले होते. ते वस्तुस्थितीला धरून नसल्याने ‘इंडिया टूडे’ने सरदेसाई यांना त्या वृत्तवाहिनीवरून दोन आठवड्यांसाठी बाजूला केले आहे.

ही बातमी पण वाचा : ‘आंदोलनजीवी’ शब्द हा निष्ठुर नाही का?- शशी थरूर

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER