उत्तराखंड मुख्यमंत्र्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यास स्थगिती

Trivendra Singh Rawat-SC

नवी दिल्ली : उत्तराखंडचे मुख्यंमत्री त्रिवेंद्र सिंग रावत (Trivendra Singh Rawat) यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या आरोपावरून गुन्हा नोंदवून केंद्रीय गुप्तचर विभागाने (CBI) तपास करावा, या उत्तराखंड उच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी दिलेल्या आदेशास सर्वोच्च न्यायालयाने (SC)गुरुवारी अंतरिम स्थगिती दिली.

रावत यांनी याचिकेत मांडलेल्या मुद्द्यांवर सविस्तर विचार होण्याची गरज आहे, असे नमूद करत न्या. अशोक भूषण, न्या. आर. सुभाष रेड्डी व न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठाने प्रतिवादींना औपचारिक नोटीस काढली.

त्रिवेंद्र सिंग रावत सन २०१६ मध्ये भाजपाचे झारखंड प्रभारी असताना तेथील गौसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यासाठी आपल्या नातेवाइकांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगून ए.ए. चौहान नावाच्या व्यक्तीकडून कथित लाच घेत असताच्या ‘स्टिंग आॅपरेशन’चा एक व्हिडीओ ‘समाचार प्लस’ या स्थानिक वृत्तवाहिनीचे पत्रकार व मालक उमेश शर्मा यांनी यंदाच्या जुलैमध्ये प्रसारित केला होता. त्या व्हिडीओमध्ये डॉ. हरिंदर रावत व त्यांची पत्नी सविता रावत यांच्या बँक खात्यात ठरावीक रक्कम जमा झाल्याच्या नोंदी असलेली कागदपत्रे कॉम्प्युटर स्क्रीनवर दाखविली गेली होती. यातील सविता रावत ही त्रिवेंद्र सिंग यांच्या पत्नीची यांची सख्खी बहीण (मेहुणी) आहे. बँक खात्यात जमा झालेली ती रक्कम त्रिवेंद्र सिंग रावत यांना लाच म्हणून देण्यासाठी चौहान यांनी जमा केलेली होती, असा दावा पत्रकार उमेश शर्मा यांनी केला होता.

डॉ. हरिंदर रावत यांनी या ‘स्टिंग व्हिडीओ’ च्या संदर्भात उमेश शर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंविला होता. तो रद्द करण्यासाठी शर्मा यांनी केलेल्या याचिकेवर न्या. रवींद्र मैथानी यांनी वरीलप्रमाणे आदेश दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER