तरुणाच्या पार्थिवावर मृत्यूनंतर तीन वर्षांनी पुन्हा ‘पोस्टमार्टेम’

Mumbai Hc & Court order
  • पोलिसी मारहाणीच्या संशयानंतर हायकोर्टाचा आदेश

मुंबई : मोबाईल चोरीच्या संशयावरून धारावी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व कोठडीत केलेल्या कथित मारहाणीमुळे तीन वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या सचिन जयस्वार या १७ वर्षांच्या तरुणाच्या पार्थिवाचे पुन्हा एकदा ‘पोस्टमार्टेम’ करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला.

मयत तरुणाचे वडील रवींद्र जयस्वार यांनी केलेल्या याचिकेवर न्या. संभाजी शिवाजी शिंद व न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. त्यानुसार जे. जे. इस्पितळात खास नेमलेल्या डॉक्टरांच्या तुकडीने हे दुसरे ‘पोस्टमार्टम’ मंगळवार ६ एप्रिलपर्यंत पूर्ण करून त्याचा अहवाल लगेच न्यायालयास सादर करायचा होता. ज्या डॉक्टरांनी आधीचे ‘पोस्टमार्टम’ केले होते त्यांच्यापैकी कोणीही दुसरे ‘पोस्टमार्टम’ करणाºया तुकडीत असता कामा नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.

धारावी पोलिसांनी सचिन जयस्वारला ज्या दिवशी ताब्यात घेऊन कोठडीत ठेवले होते त्या दिवशीचे (१३ जुलै, २०१८) तेथील ‘सीसीटीव्ही’चे फूटेज आपल्या दालनात पाहिल्यानंतर न्यायमूर्तींनी हा दुसर्‍या पोस्टमार्टमचा आदेश दिला. हे फूटेज पाहताना सचिनचे वडील आणि आई, त्यांचे वकील अ‍ॅड. सिद्धार्थ चंद्रशेखर, अतिरिक्त पब्लिक प्रॉसिक्युटर जे. पी. याज्ञिक व  गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक व तपासी अधिकारी योगेश चव्हाण हेही न्यायमूर्तींच्या दालनात हजर होते.

धारावी पोलिसांनी सचिन यास मोबाईल चोरीच्या संशयावरून ताब्यात घेतले होते. पण त्याच्यावर कोणताही औपचारिक गुन्हा नोंदविला नव्हता. कोठडीत ठेवलेल्या सचिनची प्रकृती खालावल्यावर पोलिसांनी त्याला कुटुंबियांच्या ताब्यात दिले. त्यानंतर काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी केलेल्या मारहाणीने त्याचा मृत्यू झाला असा आरोप कुटुंबियांनी केल्याने त्याचे ‘पोस्टमार्टम’ केले गेले होते. पण त्यातून सचिनचा मृत्यू न्यूमोनियाने झाला असा निष्कर्ष काढढला गेला. कुटुंबियांनी पुन्हा ‘पोस्टमार्टम’ करण्याची मागणी केली व तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. न्यायालयाच्या आदेशानुसार दुसरे ‘पोस्टमार्टेम’ झाल्यावर सचिनचे पार्थिव कुटुंबियांच्या हवाली करम्यात आले असून आता मृत्यूनंतर सुमारे तीन वर्षांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. दुसरे ‘पोस्टमार्टेम’ करावे व त्यातून सचिनचा मृत्यू मारहाणीने झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित पोलिसांविरुद्ध कारवाई करावी, यासाठी त्याच्या वडिलांनी याचिका केली आहे.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button