आयपीएलमध्ये या खेळाडूंची होऊ शकते ट्रान्सफर

आयपीएल २०२०चे (IPL 2020) सामने रंगात आहेत. यात दिल्ली (DD) व मुंबईसारखे (MI) संघ फाॕर्मात आहेत. केकेआर (KKR) व सनरायजर्सही (SRH) बऱ्यापैकी आहे. पण राजस्थान रॉयल्स (RR), किंग्ज इलेव्हन पंजाब(KXIP), चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांची अवस्था मात्र खराब आहे. या संघांना संतुलन कसे साधायचे हा मोठा प्रश्न आहे. आपला संघ अधिक मजबूत कसा करायचा यासाठी त्यांना ‘मिड सिझन ट्रान्सफर’ अशी नवी संधी मिळाली आहे. यानिमित्ताने बेंचवर बसून राहिलेल्या काही खेळाडूंनाही संधी आहे. त्यात चेन्नई सुपर किंग्जचा मिचेल सँटनर, सनरायजर्स हैदराबादचा बिली स्टॕनलेक, मुंबई इंडियन्सचा मिचेल मॕकलेनघन, राजस्थान रॉयल्सचा डेव्हिड मिलर व रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा डेल स्टेन यांचा समावेश आहे. न्यूझिलंडचा फिरकी गोलंदाज मिचेल सँटनर याला सीएसकेकडून अजूनही संधीची प्रतीक्षा आहे.

चेन्नईच्या संघात फाफ डू प्लेसीस, शेन वॅटसन, सॕम करन व ड्वेन ब्राव्हो हे परदेशी खेळाडूच्या जागेवर जवळपास स्थिर आहेत. त्यामुळे सँटनरला संधी मिळणे अवघडच आहे. दुसरीकडे किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ सहापैकी पाच लढती गमावून धडपडत आहे. त्यांना अजूनही संतुलित संघाचे गणित जमलेले नाही. ग्लेन मॕक्सवेलला डच्चू देण्याची मागणी जोरात आहे. अशा वेळी सँटनरला किंग्ज इलेव्हन आपल्या तंबूत स्थान देण्याची शक्यता आहे. बिली स्टॕनलेक हा एसआरएचकडून रॉयल चॅलेंजर्स किंवा किंग्ज इलेव्हनकडे जाऊ शकतो. या ऑस्ट्रेलियन डावखुऱ्या जलद गोलंदाजाच्या नावावर आयपीएलच्या ६ सामन्यांत ७ विकेट आहेत. डेव्हिड वाॕर्नर, जाॕनी बेयरस्टो, केन विल्यम्सन व राशिद खान हे संघात असताना त्याला स्थान मिळण्याची शक्यता कमीच आहे.

रॉयल चॅलेंजर्स व किंग्ज इलेव्हनला एका जलद गोलंदाजाची गरज आहे. त्यामुळे ते स्टॕनलेकसाठी प्रयत्न करतील असा अंदाज आहे. मुंबई इंडियन्सच्या संघातील मिशेल मॕकलेनघन याने डावखुरा जलद गोलंदाज म्हणून आपली उपयुक्तता सिद्ध केलेलीच आहे. पण मुंबईच्या संघात जेम्स पॕटीसन व ट्रेंट बोल्ट हे चांगली कामगिरी करत असताना नेथन कोल्टर नाईलसुद्धा वेटिंगवर आहे. त्यामुळे मॕक्लेनघनला संधी मिळणे कठीणच आहे. यामुळे त्यालासुद्धा किंग्ज इलेव्हन किंवा राजस्थान रॉयल्स आपल्या जाळ्यात ओढण्याची शक्यता आहे.

डेव्हिड मिलर हासुद्धा राजस्थान रॉयल्सकडून दुसऱ्या संघाकडे जाऊ शकतो. पहिल्या सामन्यात सीएसकेविरुद्ध एकही चेंडू न खेळताच धावबाद झाल्यापासून त्याला संधी मिळालेली नाही. आता तर बेन स्टोक्सही उपलब्ध होईल. त्यामुळे मिलरला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. सीएसकेकडे फाफ डू प्लेसिस व शेन वॉटसन यांना विश्रांती देण्यासाठी चांगला फलंदाज नाही. त्यामुळे सलामीला किंवा मधल्या फळीत खेळणाऱ्या डेव्हिड मिलरचा ते विचार करू शकतात. रॉयल चॅलेंजर्सच्या संघातील डेल स्टेन अद्याप फारसा प्रभाव पाडू शकलेला नाही. त्यामुळे आरसीबीने त्याला ट्रान्सफर करायचे ठरवले तर राजस्थान रॉयल्स किंवा किंग्ज इलेव्हनकडे तो जाऊ शकतो. अनुभवासाठी हे संघ त्याला घेऊ शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER