विखे पाटील शिवसेनेत जाण्याची शक्यता; भाजपासाठी ठरणार मोठा धक्का

CM Uddhav Thackeray - Radhakrishna Vikhe Patil

अहमदनगर : काँग्रेस पक्षात असतांना विरोधीपक्ष नेतेपद सोडून भाजपात सहभागी झालेले राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा एकदा ‘यू टर्न’ मारण्याच्या तयारीत असल्याचे आज दिसून आले. विखे पाटील आता भाजपाला रामराम ठोकून सत्ताधारी महाविकास आघाडीतील एखाद्या पक्षात प्रवेश करणार की काय, अशा चर्चा रंगल्या आहेत. मात्र त्यांनी असा निर्णय घेतल्यास त्यांच्यापुढे शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय नसल्याने ते शिवसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा सध्या त्यांच्या गृहजिल्ह्यात सुरु झाली आहे.

शिवभक्तांच्या साक्षीने शिवनेरीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा ‘ऑन द स्पॉट’ फैसला

भाजप आमदार आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल आपल्या श्रीरामपूरमधील जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमाच्या फ्लेक्स बोर्डावरुन भाजपाचे चिन्ह अथवा नाव गायब होती. या कार्यक्रमासाठी भाजपचे जिल्ह्यातील किंवा राज्यातील कोणतेही नेते उपस्थित नव्हते. नुकतंच पंकजा मुंडे यांच्या संपर्क कार्यालयाचं मुंबईत उद्घाटन झालं, त्यावेळी भाजपाचे अनेक नेते हजर राहिले होते. मात्र विखेंच्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी भाजपाच्या नेत्यांनी पाठ फिरवल्याने भुवया उंचावल्या आहेत.

विशेष म्हणजे, या कार्यक्रम स्थळी लावलेला एक फ्लेक्स सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. ‘चलो एक पहल की जाए… नए रस्ते की ओर…’ असं या होर्डिंगवर लिहिलं होतं. याचा नेमका अर्थ काय घ्यावा, यावरुन उलटसुलट चर्चा सुरु झाल्या.

महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी विखे पाटील शिवसेनेत होते. त्यामुळे रिव्हर्स गिअर टाकल्यास ते काँग्रेसमध्ये जाणार की शिवसेनेत, याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध नसल्याने राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता नाही. तर काँग्रेस पक्ष सोडून गेल्याने त्यांचा योग्य मानसन्मान मिळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्यापुढे शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय नसल्याने ते शिवसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा सध्या सुरु आहे. आता विखेंनी अशाप्रकारचा निर्णय घेतला तर तो भाजपासाठी मोठा धक्का मानला जाईल.