बॉलिवूडमधील पडद्यावरील लोकप्रिय जोड्या

Popular on-screen pairings in Bollywood

जगातली कुठल्याही देशात जे सिनेमे तयार होतात त्यात प्रेम या विषयावर आधारित सिनेमाची संख्या जास्त असल्याचेच दिसून येते. सिनेमा अॅक्शन असो, थ्रिलर असो, ऐतिहासिक असो वा पौराणिक त्यात प्रेम दिसतेच. बॉलिवूडमध्ये (Bollywood news) तर प्रेम या विषयावर जगात सगळ्यात जास्त सिनेमे तयार झाले असतील असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. प्रेम हा विषय भारतीय प्रेक्षकांचा अत्यंत आवडता विषय आहे. त्यामुळेच प्रेमात पडलेल्या नायक-नायिकेंच्या रुपात प्रेक्षक स्वतःला पाहात असतात. दिलीप कुमारचा ‘देवदास’, गुरुदत्तचा ‘प्यासा’ ते शाहरुख, काजोलचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ आणि दोन वर्षांपूर्वी रिलीज झालेला शाहीद कपूरचा ‘कबीर सिंह’ या सिनेमात प्रेमाची वेगवेगळी रुपे दाखवण्यात आलेली आहेत. हिंदी सिनेमात काम करणाऱ्या काही नायक-नायिकांच्या जोड्या प्रचंड लोकप्रिय झालेल्या आहेत. या जोड्यांचे सिनेमे पाहाण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. उद्या ‘व्हॅलेंटाईन’ म्हणजेच जागतिक प्रेम दिवस आहे. त्यानिमित्ताने रुपेरी पडद्यावर प्रचंड लोकप्रिय आणि वास्तव जीवनातही एकमेकांच्या प्रेमात असलेल्या काही जोड्यांवर (Popular on-screen pairings) एक नजर-

राज कपूर- नर्गिस

बॉलिवूडमधील प्रचंड लोकप्रिय आणि सगळ्यात रोमँटिक जोडी म्हणून जर कोणाचे नाव घ्यायचे झाले तर ते राजकपूर आणि नर्गिसचे घ्यावे लागेल. या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. या दोघांची पडद्यावरील केमिस्ट्री खूपच जबरदस्त होती. केवळ पडद्यावरच नव्हे तर वास्तव जीवनातही ही जोडी एकमेकांच्या प्रेमात होती. जवळ-जवळ एक दशक या दोघांनी एकत्र काम केले. या दहा वर्षात या जोडीने ‘आवारा’, ‘श्री 420’, ‘अंदाज़’, ‘चोरी-चोरी’, ‘आग’, ‘बरसात’ असे 16 सुपरहिट सिनेमे दिले आहेत. या जोडीचा प्रत्येक सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झालेला आहे. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही ही जोडी प्रचंड लोकप्रिय होती.

दिलीप कुमार- मधुबाला

दिलीप कुमारला बॉलिवूडमध्ये ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जाते. खरे तर हिंदी सिनेमात हीरो मरत नाही पण दिलीप कुमार यांना निर्मात्यांनी अनेक सिनेमात शेवटी मारले होते. दुसरीकडे देवाने अत्यंत सावकाशपणे मनापासून तयार केलेली सौंदर्यवती मधुबाला. अशा या दोघांनी सर्वप्रथम 1950 मध्ये ‘तराना’ सिनेमात काम केले होते. पहिल्याच सिनेमात काम करताना हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर या दोघांनी ‘संगदिल’, ‘अमर’ सिनेमात काम केले आणि त्यांचे प्रेम दिवसेंदिवस वाढू लागले होते. दिलीप कुमारने मधुबालाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु मधुबालाच्या वडिलांनी या दोघांचे लग्न होऊ दिले नव्हते. या दोघांच्या कारकिर्दीतील ‘मुघले आझम’ हा सिनेमा प्रेक्षक कधीच विसरू शकणार नाहीत असा आहे. भारतीय सिनेमा इतिहासाच्या पुस्तकातील हा सिनेमा एक सोनेरी पान आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

धर्मेंद्र- हेमा मालिनी

बॉलिवूडचा हीमॅन धर्मेंद्र आणि राजकपूने ड्रीम गर्ल असे नामकरण केलेली हेमा मालिनी या दोघांच्या जोडीने प्रेक्षकांना वेड लावले होते. धर्मेंद्रचा धसमुसळेपणा आणि लाजाळू हेमाची जोडी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. या दोघांचा सिनेमा पाहाण्यासाठी प्रेक्षक रांगा लावत असत. या दोघांनी सर्वप्रथम ‘तुम हंसीं मैं जवां’ सिनेमात काम केले. त्यानंतर तब्बल 28 सिनेमात या दोघांनी काम केले. रुपेरी पडद्यावरील ही जोडी वास्तवातही एकमेकांच्या प्रेमात पडली होती. हेमा मालिनीशी लग्न करण्यास अनेक नायक एका पायावर तयार होते. पण हेमाने धर्मेंद्रलाच मनापासून वरले होते. त्यामुळे लग्न झालेले असतानाही धर्मेंद्रने हेमाशी लग्न करण्यासाठी काही काळापुरता धर्मही बदलला होता. राजेश खन्ना-मुमताज

राजेश खन्ना म्हणजे रोमांसचा बादशाह. त्याच्या या इमेजवर लाखों मुली वेड्या झाल्या होत्या. राजेश खन्नाचे दर्शन व्हावे म्हणून मुली अक्षरशः मरत असत. दुसरीकडे सी ग्रेड आणि दारा सिंहची नायिका म्हणून ओळखली जाणारी मुमताज. मुमताजने अभिनयाच्या बळावर मेन स्ट्रीममध्ये प्रवेश केला होता. 1969 मध्ये ‘दो रास्ते’ सिनेमात दोन वेगळ्या रस्त्यावरील हे दोन कलाकार प्रथमच एकत्र आले आणि प्रेक्षकांनी या जोडीला डोक्यावर घेतले होते. राजेश खन्ना आणि मुमताजची केमिस्ट्री जबरदस्त जमली होती. ही जोडी प्रेक्षकांना आवडली असल्यानेच निर्मात्यांनी या दोघांना एकत्र साईन केले होते. या दोघांनी जवळ जवळ 10 सिनेमात एकत्र काम केले होते. यापैकी ‘दो रास्ते’सह ‘बंधन’, ‘सच्चा झूठा’, ‘दुश्मन’, ‘राजा रानी’, ‘आपकी कसम’ ‘रोटी’ हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाले होते.

अमिताभ बच्चन- रेखा

अमिताभ बच्चन आणि रेखाची जोडी हिंदी पडद्यावरील सगळ्यात चर्चेत असणारी जोडी होती आणि आहे. आजही या दोघांचे नाव एकत्रच घेतले जाते. साऊथमधून बॉलिवूडमध्ये आलेल्या या सावळ्या रंगाच्या सुरवंटाचे फुलपाखरता अमिताभ बच्चनेच रुपांतर केले होते. प्रेक्षकांनीही या जोडीला डोक्यावर घेतले होते. अमिताभ आणि रेखा 1976 मध्ये ‘दो अनजाने’ सिनेमातून एकत्र आले आणि त्यानंतर त्या दोघांची चांगलीच गट्टी जमली. त्यानंतर या दोघांनी ‘आलाप’, ‘खून पसीना’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘मिस्टर नटवरलाल’, ‘सुहाग’, ‘सिलसिला’ असे जवळ जवळ 18 सिनेमे एकत्र केले असून बहुतेक सगळे सिनेमे सुपरहिट झाले आहेत.

याशिवाय 90 च्या दशकात अनिल कपूर- माधुरी दीक्षित ही जोडीही सुपरहिट ठरली होती. या दोघांनी ‘तेजाब’, ‘परिंदा’, ‘बेटा’, ‘किशन कन्हैया’, ‘राम लखन’, ‘पुकार’, ‘खेल’ यासह अनेक सुपरहिट सिनेमात एकत्र काम केले आहे. 1987 मध्ये ‘हिफाजत’ सिनेमातून हे दोघे एकत्र आले होते आणि आता शेवटचे 2019 मध्ये ‘टोटल धमाल’ सिनेमात एकत्र दिसले होते. या जोडीने जवळ जवळ 20 सिनेमे केलेले आहेत.

आमिर खान-जूही चावला, सलमान खान-ऐश्वर्या राय, शाहरुख खान-काजोल या जोड्याही रुपेरी पडद्यावर प्रचंड यशस्वी ठरलेल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER