लोकप्रिय आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक; शरद पवारांनी घेतली भेट

Sharad Pawar & Baharat Bhalke

पुणे : राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचे अत्यंत निकटवर्तीय भारत भालके (Bharat Bhalke) यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शरद पवार यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

भारत भालके यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांची ३० ऑक्टोबर रोजी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मात्र, त्यानंतर पाच दिवसांनी ४ नोव्हेंबर रोजी त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. ते घरीसुद्धा आले होते. पण काही दिवसांनी पुन्हा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांना मागील आठवड्यात पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

परंतु, गुरुवारपासून त्यांची तब्येत अचानक खालावली. त्यांना किडनीचा आजार आणि मधुमेहाचा त्रास आहे. भालके यांच्या दीर्घायुष्यासाठी कुटुंबीयांनी आज सकाळी विठ्ठलाला साकडे घातले. सोशल मीडियावर त्यांच्या प्रकृतीची  उलटसुलट चर्चा सुरू आहे. ‘भालके उपचारांना प्रतिसाद देत असून लवकरच ते बरे व्हावे’, यासाठी त्यांचे बंधू पंजाबराव भालके यांनी विठ्ठल-रुक्मिणीला साकडे  घातले आहे. भारत भालके हे हॅट्रिक आमदार म्हणून प्रसिद्ध आहेत.

त्यांनी सलग तीन वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. मागील २०१९ ची  निवडणूक त्यांनी राष्ट्रवादीकडून लढवली आणि जिंकली होती. तसंच २००९ साली पंढरपूर विधानसभा निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा त्यांनी पराभव करून ते जायंट क्लिलर ठरले होते.

२०१९ साली माजी आमदार (कै.) सुधाकर परिचारक यांचा त्यांनी पराभव केला होता. २००२ पासून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून आजतागायत काम पाहात आहेत. दरम्यान, ‘आमदार भारत भालके यांची प्रकती अतिशय नाजूक आहे, पोस्ट कोविड त्रासांमुळे त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली आहे. आम्ही लक्ष ठेवून आहोत’, अशी माहिती रुबी हॉस्पिटलचे डॉक्टर परवेझ ग्रँट यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER