पूजाच्या आई-वडिलांना राठोडांकडून पाच कोटी मिळाले; पूजाच्या आजीचा गौप्यस्फोट

Shantabai Rathod - Pooja Chavan - Sanjay Rathod

पुणे : पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर विरोधकांच्या टप्प्यात आलेले शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर काल वनमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मागील अनेक दिवसांपासून माध्यमांत झळकत असलेले पूजासोबतचे फोटो, ऑडिओ क्लिप, दोन आठवडे बाळगलेलं मौन, पोहरादेवीतलं शक्तिप्रदर्शन राठोड यांना मोठं महागात पडलं. आता या प्रकरणात आणखी काय काय समोर येणार, याकडे राज्याचं लक्ष लागलेल असतानाच आता पूजा चव्हाणच्या चुलत आजी शांता राठोड यांनी एक अतिशय धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.

पूजाच्या आई-वडिलांना संजय राठोड यांनी पाच कोटी रुपये पोहोचवले ,त्यामुळेच त्यांना पूजाच्या हत्याऱ्याविषयी बोलायचे नाही आणि पैशामुळे माझे चुलत आजी नातेही त्यांना दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी पूजाच्या आई वडिलांनी दिलेल्या खोट्या माहितीला बळी पडू नये आणि पूजाला न्याय द्यावा, अशी मागणी शांताबाई यांनी केली आहे.

शांताबाई म्हणाल्या की, ज्या आई-वडिलांना पैशांसमोर स्वतःच्या मुलीची किंमत वाटत नाही, तर मी चुलत आजी कुठली कोण? पूजाच्या आईवडिलांनी समाजाची दिशाभूल तर केलीच आता मुख्यमंत्र्यांची ही दिशाभूल करत आहेत. संजय राठोड यांनी पूजाच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये देऊन त्यांचा आवाज दाबला आहे. त्यामुळे पूजाचे आई-वडील कधीही समोर येऊन संजय राठोड यांच्या विरोधात बोलणार नाही. आमची मुलगी आजारी होती आणि त्यानेच ती मेली असेच ते सांगतील.

दरम्यान, माजी मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी वानवडी पोलीस ठाण्याबाहेर काल आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि पूजाच्या आजी शांताबाई चव्हाण यांना वानवडी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. तृप्ती देसाई आणि शांताबाई चव्हाण पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा आरोप करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड यांनी सरकारे कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली ही नोटीस बजावली आहे. या नोटिशीमध्ये ‘तुमची तक्रार लिहून घेतली असून त्यावर चौकशी करण्यात येईल असे तुम्हाला सांगण्यात आले आहे. तरी देखील तुम्ही आताच्या आता गुन्हा दाखल करावा यासाठी आंदोलन करत आहात. ही बाब शासकीय कामात अडथळा ठरते. आम्हाला कायदेशीर मार्गाने काम करू द्या अन्यथा तुमच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई करण्यात येईल’ असे म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER